सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत:
अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून
मिळणार अनुदान
सोलापूर : राज्यातील अंशत: अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार पटसंख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत.
पटसंख्या कमी झाल्यास पदे कमी करण्यात येणार असून ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत. टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती 'बायोमेट्रिक' प्रणालीत नोंदविली जात असल्याची खात्री करावी. तीन महिन्यांचा डीजीटल रेकॉर्ड बंधनकारक आहे. अट पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, पण अटींचे पालन न करणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
ठळक बाबी...
२० टक्क्यांवरील २०७९ शाळा, ४१८३ तुकड्यांवरील १५ हजार ८५९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३०४ कोटींचे अनुदान४० टक्क्यांवरील १७८१ शाळा व २५६१ तुकड्यांवरील १३ हजार ९५९ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २७६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर६० टक्के अनुदानावरील एक हजार ८९४ शाळा व २१९२ तुकड्यांवरील १९ हजार ७४४ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३४१ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी
किती शाळा अन् तुकड्यांना अनुदान...
२० टक्के अनुदानावरील २०२ प्राथमिक शाळा व १५४९ तुकड्यांवरील दोन हजार ७२८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, २७२ माध्यमिक शाळा व ११०४ तुकड्यांवरील पाच हजार २५४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि एक हजार ६०५ कनिष्ठ महाविद्यालये व १५३० तुकड्यांवरील सात हजार ८७७ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के (३०४ कोटी रुपये) अनुदान मिळणार आहे.
४० टक्के अनुदानावरील २१२ प्राथमिक शाळा व ७३८ तुकड्यांवरील दोन हजार ३८ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, २२४ माध्यमिक शाळा व ३१० तुकड्यांवरील दोन हजार ८६६ आणि एक हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालये व १५१३ तुकड्यांवरील नऊ हजार ५५ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील २० टक्के वाढीव अनुदान मिळणार आहे. त्यासाठी २७६ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ६० टक्के अनुदानावरील ४०६ प्राथमिक शाळा व १२२६ तुकड्यांवरील ३८३६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, १४८८ माध्यमिक शाळा व ९६६ तुकड्यांवरील १५ हजार ९०८ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३४१ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
नव्याने २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या ८१ प्राथमिक शाळा व ५०५ तुकड्यांवरील ८९० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ८१ माध्यमिक शाळा व ११५ तुकड्यांवरील १०८३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ६९ कनिष्ठ महाविद्यालये आणि ७५ तुकड्यांवरील ७४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील ४८ कोटी ३२ लाखांचा निधी मिळाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.