पुसेगाव: शासनाच्या धोरणानुसार सध्या गावोगावी घरगुती वीज वापरासाठी नवीन मीटर जोडले जात आहेत. मात्र, ग्राहकांच्या वीज बिलात दुप्पट, तिप्पट वाढ होत आहे. त्यामुळे स्मार्ट वीज मीटर बदलीस विरोध आणि जुने मीटर पुन्हा बसवावेत या मागणीसाठी मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुसेगांव बंदची हाक देण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनानुसार पुसेगाव येथील ज्या ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन डिजिटल स्मार्ट मीटर जोडले आहेत त्यांना वीज बिल वाढून येत आहे.
तक्रार घेऊन गेल्यास त्याचा निपटाराही होत नाही.
त्यामुळे पुसेगावमधील राहिलेल्या ग्राहकांचा जुना मीटर बदलण्यास तीव्र विरोध आहे. ज्या ग्राहकांना वीज बिल वाढून आली आहेत त्यांची बिले तातडीने कमी करून द्यावीत तोपर्यंत वीज वितरण कंपनीने वसुली थांबवून कोणाचे ही वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.याबाबत वीज वितरण कंपनीच्या विविध कार्यालयाशी संपर्क केला असता हे अधिकारात येत नाही तसेच उडवाउडवीची ही उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ उत्सफुर्तपणे पुसेगावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.दरम्यान कायदा सुव्यवस्था व सामाजिक शांतता भंग झाल्यास ती जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहिल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे.आधीच ओल्या दुष्काळाच्या छायेत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी व कष्टकरी वर्गाला अतिरिक्त वीजबिलाचा नाहक त्रास सोसावा लागत असल्याने समाजात वीज वितरण कंपनीवर अत्यंत रोष निर्माण होत आहे. वाढीव आलेली वीज बिले कमी करून जुने मीटर बदलीचा निर्णय कंपनीने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरज जाधव यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.