सांगली, ता. ११: येथील प्रसिद्ध छायाचित्रकार उदय नारायण देवळेकर (वय ६५) यांचे आज रात्री निधन झाले. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी 'सकाळ माध्यम समूहा'साठी छायाचित्रकार म्हणून काम केले. सध्या ते 'पीटीआय'साठी कार्यरत होते. उदय देवळेकर महिनाभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
उदय यांचे वडील नारायण देवळेकर हे प्रख्यात छायाचित्रकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत उदय यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. 'सकाळ माध्यम समूहा'समवेत काम करताना त्यांनी सांगलीतील दुष्काळ, महापूर यांसह विविध राजकीय व सामाजिक स्थित्यंतरे कॅमेराबद्ध केली. त्याची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेण्यात आली होती. सांगली जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा 'सकाळ'चे छायाचित्रकार सोहम देवळेकर असा परिवार आहे. उदय देवळेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीतील विविध क्षेत्रांत शोककळा पसरली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.