पुणे: पोलिसांचा वचक नसल्याची उदाहरणे सतत नजरेसमोर येत असून त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. दुचाकी वेडीवाकडी चालविल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलिसांना भर चौकात टोळक्याने मारहाण केली. मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकीच्या चर्च चौकात गुरुवारी (३१ जुलै) रात्री ही घटना घडली. टोळक्याच्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चौघांना अटक केली.
जुनैद इक्बाल शेख ( २७, रा. आदित्यनगर, भोसरी), नफीज नौशाद शेख ( २५, रा. आदित्यनगर, भोसरी), युनुस युसुफ शेख ( २५, रा. गौरीनगर, भोसरी, मुळ रा. भुसावळ), आरिफ अक्रम शेख ( २५, रा. संत तुकारामनगर, भोसरी) यांना अटक केली आहे. याबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोपाल गोठवाल यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, गोठवाल आणि काजळे हे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात नियुक्तीस आहेत. ते रात्री साडेआठला मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते.
त्यावेळी दोघेजण दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना दुचाकी वेडवाकडी का चालविता ? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ केली. विचारणा करणारा तू कोण? असे आरोपी म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी आरोपींनी गोठवाल, काजळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींचे आणखी दोन साथीदार दुसऱ्या दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनीही पालिसांना मारहाण केली. यात गोठवाल रस्त्यात पडले. चौघा आरोपींनी गोठवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काजळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की केली. काजळे यांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. गस्तीवरील पोलीस पथक तेथे पोहोचले. चौघांना ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत गोठवाल यांचे डोके, छातीला दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.