सांगली: शहरातील भाजी मंडई परिसरातून मंगळवारी रात्री २३ गाढवे चोरून नेण्यात आली. आंध्र प्रदेशमधील टोळीने ही गाढवे चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहर पोलिसांचे एक पथक चोरट्यांच्या मागावर आहे. गाढवाची चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने मालकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी सांगितले की, हरिपूर येथील अरविंद पोपट माने (वय ३४, गोठणभाग) यांच्या मालकीची ३ लाख ४५ हजार रुपये किमतीची २३ गाढवे होती. ही गाढवे २२ रोजी रात्री नऊ वाजता शिवाजी मंडई परिसरात फिरत होती. रात्री एक वाजता माने यांनी गाढवांचा मंडई परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाहीत. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मंडई परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात काहीजण कंटनेरमध्ये गाढवे घालत असल्याचे दिसून आले. ही टोळी आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक टोळीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. या आधीही जिल्ह्यातून आंध्र प्रदेशमध्ये गाढवांची तस्करी करण्यात आली होती.
चीनमध्येही तस्करी
गाढवांची चोरी करून लाखो रुपयांना विक्री करणारी परराज्यातील टोळी सक्रिय झाली आहे. प्रामुख्याने आंध्र प्रदेश व हैदराबाद हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे. मध्यंतरी सांगली-मिरजेसह जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली होती. औषधनिर्मिती व उत्तेजना वाढविण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.