मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून गेल्या सहा महिन्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत. 30 जुलै रोजी राज्यातील पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत 12 ऑगस्टला अन्य सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या होऊन काही दिवस उलटत नाही तेच आता पुन्हा एकदा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती झालेले रघुनाथ गावडे हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहात होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी परभणीत अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली. पण आता त्यांची थेट मुंबईला बदली करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी आता संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, गावडे यांची मुंबईमध्ये नियुक्ती झाल्यानंतर याबद्दल परभणीतील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी गावडे यांनी कायमच शेतकऱ्यांशी परस्पर संवाद साधून त्यांना मदत केली. ज्यामुळे त्यांच्या बदलीमुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.1. आयएएस अधिकारी योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.2. आयएएस अधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती.3. आयएएस अधिकारी संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.4. आयएएस अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.5. आयएएस अधिकारी वर्षा मीना यांची अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.