Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील : रवींद्र चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील : रवींद्र चव्हाण
 

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा केला जाईल, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगलीत पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात केले. दरम्यान, या सभेच्या निमित्ताने भाजपने महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. येथील संजयनगरमध्ये पक्षप्रवेश व भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, जयश्री पाटील, नीता केळकर, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, रमेश शेंडगे, चिमण डांगे, सुजितकुमार काटे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, हमाल नेते बाळासाहेब बंडगर, सांगली बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर व अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश, राज्याची वेगाने प्रगती होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्य विकासात मागे पडले. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, सरकार आले. फडणवीस हे राज्याला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. शेतकरी, कष्टकरी समाजाचा विकास याला या सरकारने प्राधान्य दिले आहे. येणार्‍या काळात सांगली व परिसर तसेच जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील. भाजप महायुतीकडून महापालिका क्षेत्राच्या विकासाचा जाहीरनामा तयार होईल. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील. चव्हाण म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यारूपाने सांगली जिल्ह्याला चांगले पालकमंत्री मिळाले आहेत. जिल्ह्याचे प्रश्न, सर्व समस्या दूर करतील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवतील. भाजपमध्ये प्रवेश केलेले मनोज सरगर हे योग्य मार्गावर आले आहेत. त्यांनी परिसरात स्वनिधीतून हनुमान मंदिर उभे केले आहे. हनुमानाची शक्ती आणि भाजपचे बळ त्यांच्या पाठीशी राहील.

...त्यांना क्षमा नाही; अहिल्यादेवींचा पुतळा उभारणार : पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास चालढकल केली जाते, याला कोणीही क्षमा करणार नाही. या चौकात साठ दिवसात पुतळा उभारावा, अशी मागणी मनोज सरगर यांनी केली आहे. मात्र त्यापूर्वीच पुतळा उभारला जाईल.

महायुतीचा महापौर..!

चंद्रकांत पाटील म्हणाले, आजची सभा पाहिली, तर सांगली महापालिकेची निवडणूक महायुतीने जिंकली आहे, महायुतीचा महापौर झाला आहे आणि त्याच्या आनंदोत्सवाची ही सभा आहे, असे वाटत आहे. भाजपवर जातीयवादी, प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांचा पक्ष, अशी टीका केली जाते. मात्र हा पक्ष सर्व जाती, धर्मांचा आहे. विरोधकांनी बहुजनांना भांडी घासायला लावली, कपडे धुवायला लावले, गाड्यांमागे घोषणा देत धावायला लावले. बहुजनांचा विकास भाजपच करत आहे.

...त्यांच्या दारात अहिल्यादेवींचा पुतळा बसवू : आमदार पडळकर
आमदार पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांना मानणार्‍यांची मते चालतात, मात्र त्यांचा पुतळा चालत नाही. ज्यांनी पुतळा बसवायला विरोध केला, त्यांच्या दारातही अहिल्यादेवींचा पुतळा बसवू, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. हमालांच्या पोरांना भाजपने न्याय दिला. कार्यकर्त्यांना सन्मान आणि न्याय देणारा पक्ष भाजप आहे. येथे जुन्यांचा स्वाभिमान राखून नव्यांचा सन्मान केला जातो. महाराष्ट्राचे हित जपणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोहिनूर हिरा आहेत. हा हिरा बहुजनांनी जपला पाहिजे.

आमदार खाडे म्हणाले, काँग्रेस हा पक्ष सोनिया गांधींचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा, शिवसेना पक्ष ठाकरेंचा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारा भाजप हाच पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडे ओढा वाढत आहे. आमदार गाडगीळ म्हणाले, गेल्या अकरा वर्षांत संजयनगर परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला. एकेकाळी बदनाम असलेला हा भाग विकासाच्या मार्गावरून जात आहे. या भागातील उर्वरित कामांसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. प्रकाश ढंग म्हणाले, महापालिकेची 2018 ची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी शंभर कोटींचा विकास निधी मिळाला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.