राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून गाई-म्हशी खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेत सामान्य शेतकऱ्याला २ देशी/संकरीत गायी खरेदीसाठी ५० टक्के म्हणजेच ७८ हजार ४२५ रुपये अनुदान आणि २ म्हशींच्या गटासाठी ५० टक्के म्हणजेच ८९ हजार ६२९ रुपये अनुदान मिळते. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना २ गायींसाठी ७५ टक्के म्हणजेच १ लाख १७ हजार ६३८ रुपये आणि २ म्हशींसाठी ७५ टक्के म्हणजेच १ लाख ३४ हजार ४४३ रुपये अनुदान मिळते.
योजनेंतर्गत उर्वरित रक्कम शेतकऱ्याने स्वतः भरावी लागते. जर शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल, तर सामान्य शेतकऱ्याने उरलेली पूर्ण ५० टक्के रक्कम स्वतः द्यायची असते. पण अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना उरलेली २५ टक्के रक्कम बँकेकडून कर्जरूपाने मिळते आणि त्यांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय, शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण, पशुवैद्यकीय सेवा आणि कर्ज मिळवण्यासाठी शासनाची मदत मिळते. त्यामुळे दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून व्यवसाय सुरू करणे सोपे होते.
योजनेचा उद्देश:
राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि बेरोजगार तरुणांना शेतीसोबत दुग्धव्यवसाय सुरू करून स्थिर उत्पन्न मिळवून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे.
योजनेच्या अटी
लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला आणि ३ टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ मिळेल.
निवड झाल्यानंतर लाभार्थ्याने एक महिन्याच्या आत स्वतःचा हिस्सा भरावा, त्यानंतर शासन उर्वरित रक्कम अनुदान स्वरूपात देईल.
लाभार्थ्याने किमान ३ वर्षे दुग्धव्यवसाय करणे बंधनकारक आहे.
जनावरांसाठी योग्य जागा, गोठा, चारा आणि पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
दुग्धव्यवसाय व गो/म्हैसपालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
जनावरांची खरेदी सरकार मान्यताप्राप्त किंवा पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रातूनच करणे गरजेचे आहे.
पात्रता
महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
अनुसूचित जाती, जमाती, महिला, बेरोजगार तरुणांना प्राधान्य.
जनावरांसाठी जागा, गोठा, चारा व पाणी उपलब्ध असणे आवश्यक
कागदपत्रे
आधारकार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक पासबुकची सत्यप्रत
फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
७/१२ सातबारा
८अ उतारा
अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणा पत्र
रेशनकार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकालाच लाभ)
७/१२ मध्ये नाव नसल्यास कुटुंब संमतीपत्र किंवा भाडेकरार
अनुसूचित जाती/जमातीचा दाखला (असल्यास अनिवार्य)
दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र किंवा बँक पासबुकची प्रत
प्रशिक्षण घेतल्यास प्रमाणपत्राची प्रत
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी Google Play Store वरून AH-MAHABMS हे अॅप डाउनलोड करा.
तसेच तालुका पशुसंवर्धन कार्यालयातूनही अर्ज मिळतो.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करा.
अर्जाची तपासणी व निवडीनंतर अनुदान मंजूर केले जाते.
संपर्क
तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय
जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय
संकेतस्थळ: https://ahd.maharashtra.gov.in
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.