कोल्हापूर : मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादातून दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली. सिद्धार्थनगर - राजेबागस्वार परिसरात दगडफेक, तोडफोड करत वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता. यामध्ये पोलिसांसह दहाजण जखमी झाले.
दंगल सुरू असताना दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला होता. यामध्ये महिलाही अग्रभागी होत्या. पोलिसांकडे महिला कर्मचारी तुलनेने कमी असल्याने या जमावातील महिलांना रोखताना पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागली.
वाहनांची तोडफोड
सिद्धार्थनगर परिसरात लावलेल्या वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली दिसेल त्या वाहनावर मोठे दगड टाकले. काही वाहने उलटवली. त्यामध्ये मालवाहतूक करणार्या रिक्षा, टेम्पोसह 10 हून अधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली.
अंधारातही दगडफेक
परिसरात धुमश्चक्री सुरू असताना पोलिस आले. यानंतर काही वेळात परिसरातील स्ट्रीट लाईटवरील वीज पुरवठा खंडीत झाला. यामुळे चौकातील हायमास्ट वगळता सर्व परिसरात अंधार पसरला होता. त्यातही दोन्ही बाजूने दगडफेक सुरू होती.
पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या
या दगडफेकीत पेट्रोल असलेल्या दोन बाटल्या फेकण्यात आल्या. हा हल्ला पूर्वनियोजितच होता. हल्ला करताना असणारा जमाव मोठा होता. त्यामुळे बाहेरूनही लोक आले असल्याचाही आरोप यावेळीकरण्यात आला.
पाच जखमींवर सीपीआरमध्ये उपचार
या दंगलीत राजेबागस्वार परिसरातील दगडफेकीत जखमी झालेल्यापैकी 5 जणांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये एका 82 वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. सिद्धार्थनगर परिसरातीलही काहीजण जखमी झाले.
हल्ला, प्रतिहल्ल्यामुळे प्रचंड तणाव
सिद्धार्थनगरात तोडफोड आणि दगडफेक झाल्यानंतर आक्रमक झालेला जमाव राजेबागस्वार परिसराच्या दिशेने चालून गेला. जमावानेही जोरदार दगडफेक केली. हल्ला आणि प्रतिहल्ल्यामुळे प्रचंड तणाव झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.