Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मोदीजी मला खोट्या आरोपात..", माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मृत्यूपूर्वीचा 'तो' Video व्हायरल

"मोदीजी मला खोट्या आरोपात..", माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मृत्यूपूर्वीचा 'तो' Video व्हायरल
 

जम्मू-काश्मीरसह त्यांनी गोवा, बिहार, मेघालय तसेच ओडिशाचे राज्यपालपदही सांभाळले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभेचेही ते सदस्य राहिले होते. जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद सोडल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. मृत्यूपूर्वी रुग्णालयात असतानाचा आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते पंतप्रधान मोदींचे नाव घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केला होता. पुलवामा दहशतवादी हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीमेवर नेण्यासाठी खरे तर विमानाची व्यवस्था करणे आवश्यक होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा घेऊन जाणे चुकीचेच होते, असे ते म्हणाले होते. तसेच 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला गप्प बसण्याचे फर्माविले होते', असेही सत्यपाल मलिक म्हणाले होते. या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. मलिक यांच्या या मुलाखतीवरून बराच वादही झाला होता.

कथित शेवटच्या व्हिडीओमध्ये काय म्हणाले?
व्हायरल होणारा शेवटचा व्हिडीओ नेमका कधी चित्रीत केला गेला, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ ९ ऑगस्टपासून व्हायरल होत आहे. याआधी या व्हिडीओची कुठेही चर्चा नव्हती किंवा त्याबद्दल बातमी आलेली नव्हती. या व्हिडीओमध्ये सत्यपाल मलिक म्हणतात, "मोदीजी मला खोट्या आरोपात अडकवू नका. ज्या प्रकरणात मला अडकवले जात आहे, त्यात मीच तक्रारदार होतो. माझ्याकडे फक्त चार कुर्ते-पायजमे आहेत, ५-६ जोडी कपडे आणि दोन घड्याळे आहेत. हीच काय ती माझी संपत्ती. दिल्लीत एक घर आहे, एवढीच मालमत्ता. मग तरी मला कोणत्या गोष्टीसाठी अडकवले जात आहे. तक्रारदारालाच आरोपी केले जाऊ शकत नाही. हे अनैतिक आहे."
 
व्हिडीओ एआय जनरेटेड की फेक?

दरम्यान व्हायरल होणारा व्हिडीओ एआय जनरेटेड आहे की फेक? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र यात मलिक यांनी दिलेली माहिती यापूर्वीही दिली होती.

भ्रष्टाचाराचा आरोप आणि गुन्हा
दरम्यान जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी असताना काही फाईल्सना मंजूरी दिल्याबद्दल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल झाला होता. मलिक यांनी उपस्थित केलेल्या दोन प्रकल्पांची केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली होती. त्यातील २२०० कोटींच्या किरू जलविद्युत प्रकल्पाबाबतच्या खटल्यात मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
कोण होते सत्यपाल मलिक?

उत्तर प्रदेशातील बागपत येथे २४ जुलै १९४६ रोजी मलिक यांचा जन्म झाला. समाजवादी विचारांच्या विद्यार्थी चळवळीतून त्यांनी भारतीय क्रांती दलात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस, जनता दल व अखेरीस भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास होता. व्ही. पी. सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.

अतिशय साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार
सत्यपाल मलिक यांच्यावर अतिशय साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरूनही वाद उफाळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत, असा आरोप काहींनी केला. भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांनी अंत्यसंस्कारावेळी जाट नेत्याला मृत्यूनंतरही अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. या आरोपानंतर जानू यांचीच पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.