तुम्ही गाडी किंवा एखादी वस्तू चोरीला गेल्याचे ऐकले असेल, पण चक्क मंत्री हरवल्याचे ऐकले तर आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे! बुलढाणा जिल्ह्यातील पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही तक्रार नोंदवली आहे. मकरंद पाटील हे पालकमंत्री, तर संजय सावकारे हे सहपालकमंत्री आहेत.
मंत्र्यांचा पत्ता नाही
बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले असतानाही, पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी २४ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल करून दोन्ही मंत्र्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच, मंत्र्यांचा शोध लावणाऱ्यास ११ रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
एसी रूममधून सूचना
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, दोन्ही मंत्री फक्त एसी रूममधून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, पण शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. तक्रारीत म्हटले आहे की, मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान पाहणे अपेक्षित होते. त्यामुळे मंत्र्यांचा शोध घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवावे, अशी मागणी तक्रारीत आहे. या तक्रारीदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे, तालुकाध्यक्ष संजय बगाडे, अल्पसंख्याक नेते शेख अयाज, डॉ. ज्ञानेश्वर रावनकार, संतोष पेसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तक्रारीत काय म्हटले?
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे की, परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके खरडून गेली आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्ह्याकडे लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी भेट दिल्याचे दिसून आले नाही.
संजय सावकारे यांचे स्पष्टीकरण
सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी याबाबत गैरसमज झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, "शासनाचा जीआर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो. सर्व विभागांच्या बैठका घेऊन नुकसानीची माहिती घेतली. यापूर्वी मलकापूर येथील गावांना भेट दिली. सोमवारी रात्री पाऊस झाला तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो, कारण दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. गेल्या आठड्यात मलकापूर येथील विवरे गावात माझा दौरा झाला. काल माझ्या भागात ढगफुटी झाल्याने तिथे दौरा केला, पण आता मी बुलढाण्याला निघत आहे." त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचेही सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.