गरब्याच्या कार्यक्रमात दगडफेक, गाड्यांची जाळपोळ; गुजरातमध्ये दोन समाजातील वादातून हिंसाचार, काय घडलं?
गुजरातच्या गांधीनगरमध्ये गरब्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर मोठा गोंधळ झाला. यानंतर हिंसाचाराची घटना घडलीय. गांधीनगरमधून देहगाम इथं किरकोळ वादातून दोन समाजातील लोक आमने-सामने आले. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यात काही समाजकंटकांनी तोडफोड करत जाळपोळही केली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून समाजकंटकांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देहगाम तालुक्यातील बहियाल गावात गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रात्री अचानक गरब्याच्या कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणी दगडफेक सुरू झाली. दुकानांमध्ये तोडफोड आणि गाड्यांना आग लावण्याचे प्रकार घडले. एका सोशल मीडिया पोस्टमुळे हा हिंसाचार झाल्याचं म्हटलं जात आहे.आक्षेपार्ह पोस्टमध्ये काय लिहिलं होतं आणि कुणी ती पोस्ट केली होती हे अद्याप स्पष्ट झालं नाहीय. मात्र काही लोकांनी दावा केला आहे की, हिंदूबहुल परिसरात मुस्लिम तरुण फेऱ्या मारत होते. त्यांना विचारणा केली असता वाद झाला आणि त्यानंतर दोन समाजामध्ये हिंसाचार भडकला. पोलीस सध्या हिंसाचाराचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी परिसरातलं सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं असून समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे. अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. पोलिसांनी सांगितले की, समाजकंटकांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल. त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.