सांगली :-सगरे पतसंस्थेच्या सात संचालकांना एक वर्ष शिक्षा
सांगली : ग्राहक न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा ठेवीदाराची रक्कम परत न दिल्याबद्दल नानासाहेब सगरे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., कवठेमहांकाळ या पतसंस्थेच्या सात संचालकांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ग्राहक न्यायालयाने सुनावली.
संस्थेचे व्यवस्थापक शिवलिंग मुरग्याप्पा आरळी, उपाध्यक्ष सुकुमार बाबा कोठावळे (दोघे रा. कवठेमहांकाळ), सुहास शिवाजी पाटील (रा. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ), सत्यवान परशुराम कुंभारकर (रा. शिंदेवाडी एम), दत्तात्रय कृष्णा माळी (रा. कोकळे), शहाजी रामचंद्र एडके (रा. म्हैसाळ एम), विश्वास भगवान पवार (रा. देशिंग) अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत. न्यायाधीश प्रमोद गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील मनीषा वनमोरे व अर्पिता फणसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिला. अध्यक्षांसह पाच संचालक मृत झाल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले.
विठोबा नारायण शिंदे (रा. डोर्ली, ता. जत) यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे वेगवेगळ्या चार ठेवपावतीच्या माध्यमातून या पतसंस्थेमध्ये ठेव ठेवली होती. परंतु मुदत संपून व मागणी करून देखील ठेव संस्थेने परत दिली नाही, म्हणून विठोबा शिंदे यांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयात यापूर्वी तक्रार केली होती. व्याजासह ती रक्कम परत देण्याचे आदेश 4 नोव्हेंबर 2015 रोजी दिले होते. न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा संस्थेने ती रक्कम दिली नाही, म्हणून शिंदे यांनी अॅड. दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत या संचालकांना शिक्षा होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 अन्वये अर्ज केला होता. न्यायालयामध्ये संस्था व संचालक दोषी आढळल्याने शिक्षा सुनावली. संस्थेने व संचालकांनी संयुक्तरित्या 39 हजार रुपयांच्या ठेवी व त्यावरील 6 टक्के व्याज, तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल 10 हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून 1 हजार रुपये 45 दिवसात शिंदे यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सलग तिसरी शिक्षा; घोटाळेबाजांचे धाबे दणाणले
जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी ठेवीदारांच्या ठेवींवर डल्ला मारून ते गडगंज झाले आहेत. ठेवीदार संघटना गायब झाली असून संस्था बुडवून सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही, या अविर्भावात काही संस्थाचालक समाजात फिरतात. ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून एकाच पतसंस्थेच्या संचालकांना तीन वेगवेगळ्या प्रकरणात तीन वर्षे शिक्षा झाल्याने जिल्ह्यातील पतसंस्था चालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.