Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डोंबवली :- डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू

डोंबवली :- डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू
 

डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सापाच्या चाव्यामुळे एका 4 वर्षीय बालिकेचा आणि तिच्या उपचाराधीन असलेल्या मावशीचा मृत्यू झाला आहे. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने दोघींचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट KDMC आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दालनात धारेवर धरले आणि जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केले.

नेमकं काय घडलं?

आजदे गावातील रहिवासी विक्की भोईर यांची 4 वर्षांची मुलगी प्राणवी तिच्या आईसोबत माहेरी, म्हणजेच खंबाळपाडा येथे गेली होती. रात्रीच्या वेळी, प्राणवी तिची मावशी श्रुती ठाकूरजवळ झोपली असताना ती साप चावल्याने अचानक जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने मावशी जागी झाली. मावशीने प्राणवीला तिच्या आईजवळ दिले, पण तिचे रडणे थांबत नव्हते. तिच्या रडण्याचं कारण कुणालाही समजत नव्हतं. मात्र काही वेळातच त्याच सापाने श्रुतीलाही चावा घेतला. तेव्हा कुटुंबीयांच्या लक्षात आले की, प्राणवीलाही सापानेच चावा घेतला असेल.
 
वैद्यकीय दुर्लक्षामुळे मुलीचा मृत्यू?
कुटुंबीयांनी तातडीने प्राणवी आणि तिच्या मावशीला KDMC च्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोघांचीही तब्येत 'व्यवस्थित' असल्याचे सांगितले. मात्र, एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली. परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने, तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला.
श्रुतीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं

मुलीच्या मावशीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. श्रुतीचं पुढील महिन्यात लग्न होतं. त्याची तयारी देखील सुरू होती. मात्र या घटनेनंतर आनंदीत असणाऱ्या घरात दु:खाचं सावट पसरलं आहे.

संतप्त नातेवाईकांचे आंदोलन
साप चावल्यावर केडीएमसीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांनी व नागरिकांनी शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारत धारेवर धरले. दोन जीवांच्या अशा प्रकारे मृत्यून झाल्याने डोंबिवली परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.