Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंदीचं सावट? TCS मधून ८०,००० जणांना काढल्याचं वृत्त, आयटी क्षेत्रात खळबळ

मंदीचं सावट? TCS मधून ८०,००० जणांना काढल्याचं वृत्त, आयटी क्षेत्रात खळबळ
 

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस सध्या एका कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंपनीत गेली १० ते १५ वर्षे काम करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह इतरांना नारळ देण्यात येत आहे. कारण न सांगता, अचानक बोलावून राजीनामा देण्यास सांगत आहेत. किंवा नोकरीवरून काढलं जात आहे. अशा परिस्थितीत टीसीएस कर्मचारी भीतीच्या छायेखाली काम करीत आहेत.

कंपनीनं सुरूवातीला २ टक्के म्हणजेच सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांना काढलं जाईल, असं सांगितलं होतं. मात्र आयटी संघटनांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात ही संख्या ३० हजारहून अधिक असू शकते, असं मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार समोर आलं आहे. तर, deccan herald या वेबसाईटनुसार, ८० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचं वृत्त आहे.

पुण्यातील एका कर्मचाऱ्याने मनी कंट्रोल या वेबसाईटला सांगितले की, 'मी टीसीएसमध्ये तब्बल १३ वर्षे काम केलं आहे. माझ्या प्रोजेक्टचं काम संपलं होतं. नंतर मला नवीन काम मिळालं नाही. नवीन प्रोजेक्ट मिळालं नाही. मी नव्या प्रोजेक्टसाठी विविध टीमशी चर्चा केली. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या कंपनीत काम करीत असल्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला. शेवटी मला राजीनामा द्यायलां भाग पाडलं. मी नकार दिल्यावर थेट कामावरून काढलं. इतकंच नाही तर, माझ्याकडून ६ ते ८ लाखांची वसुली करीत होते'.
 
फ्लुइडीटी लिस्टवरून ठरते कर्मचाऱ्यांचे भविष्य
अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापकांकडून एक फ्लुइडीटी लिस्ट तयार केली जाते. या यादीत नाव आलं की कर्मचाऱ्यामध्ये कितीही कौशल्य असलं, तरी त्याला नवीन प्रोजेक्ट दिलं जात नाही. एचआर त्याच्यावर सतत राजीनाम्याचा दबाव टाकते.
दुसरी नोकरीही धोक्यात

कंपनीला विरोध केल्यास दुसऱ्या नोकरीवर परिणाम होईल या भीतीमुळे कर्मचारी गप्प राहतात. न्यायालयात गेले तरी वर्षानुवर्षे खटले चालतील, पैसा तसेच वेळ खर्च होईल. मानसिक तणाव वाढण्याचीही शक्यता आहे, अशी भीती त्यांना वाटते.

आयटी संघटनांचा आरोप - कंपनीनं विश्वासघात केला
दरम्यान, FITE, UNITE, आणि AIITEU सारख्या अनेकआयटी संघटनांनी आरोप केला की, टीसीएसकडून हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. FITE सचिव प्रशांत पंडित यांनी सांगितले की, ३० ते ३५ वर्षे कंपनीला दिल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनाही ३० मिनिटात कामावरून काढलं जात आहे.' UNITE सरचिटणीस अलागुनाम्बी वेलकिन यांनी सांगितलं की, 'प्रोजोक्ट सुरू असतानाही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं बेंचवर ठेवण्यात आलं आहे'.
कंपनीनं मौन बाळगले

टीसीएसने या वादावर अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. कंपनी मौन बाळगून आहे. आता सर्वांचे लक्ष ९ ऑक्टोबरकडे आहे. टीसीएस तिमाही निकाल जाहीर करेल. पहिल्यांदाच या वादावर भाष्य करेल, अशी अपेक्षा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.