Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेनेकडून आलेले मदतीचे टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवले! संतप्त नागरिक नेमकं काय म्हणालेत? जाणून घ्या

शिवसेनेकडून आलेले मदतीचे टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवले! संतप्त नागरिक नेमकं काय म्हणालेत? जाणून घ्या
 

धाराशिवच्या परांडा भागातील पूरग्रस्त नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक आमदार तानाजी सावंत यांनी भेट दिली. यावेळी जीवनावश्यक वस्तूंच्या कीट घेऊन ५० टेम्पो भरुन आले होते. या टेम्पोवर आणि कीटच्या पाकिटांवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला. संकटकाळातही सुरु असलेला प्रचार पाहून नागरिकांनी हे टेम्पो परत घेऊन जा अशा शब्दांत त्यांना सुनावलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव पाण्याखाली आहे, या तीन दिवसांत कोणीच आलं नाही आणि आता प्रचारासाठी मदत घेऊन आलात का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. चार दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत आता आम्हाला शिंदेंच्या मदतीची गरज नाही, असं काही तरुणांनी ठणकावलं. आम्ही आत्ताशी या पुराच्या पाण्यातून बाहेर आलो आहोत, गेल्या तीन दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत. आम्हाला पोटात अन्न नसल्यानं चक्कर येत आहेत, आम्हाला सकाळपासून प्रशासनानं केवळ पाणीच पाजलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनच नव्हे तर कोणीही इतकं फिरकलेलं नाही. आता केवळ उपमुख्यमंत्री येणार आहेत म्हणून इथं आज टेम्पो आले आहेत हा केवळ यांच्या पक्षाचा देखावा सुरु आहे. सरकारनं आम्हाला काहीही दिलेलं नाही. आम्हाला आता काहीही नको, आत्ता देऊन काय उपयोग आहे. आमचा जीव चाललेला आहे, आम्हाला तीन दिवस काहीही नव्हतं मग आता कशाला मदत आणली आहे, असं एका तरुणा सोबत बोलताना म्हटलं आहे.

मदतीसाठी आलेल्या टेम्पोवर आणि कीटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो आहेत, त्यामुळं तुम्ही जाहिरात करत आहात का? असा सवाल अनेकांनी विचारलं आहे. तर दुसरीकडं काही ग्रामस्थांनी असंही म्हटलं की, आम्हाला ही मदत हवी आहे, कारण आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. आमच्या घरात कुठलंही अन्नधान्य शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं काही कीट आम्हाला मिळू द्या. तसंच आमचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकारनं आम्हाला मदत जाहीर करावी, अशी मागणीही काही तरुणांनी केली. या वादातून हे मदतीचे टेम्पो गावात आल्यानंतर काहीकाळ गोंधळ पाहायला मिळाला.

.दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे ५० टेम्पो परांडा भागातील गावांमध्ये दाखल झाले आहेत. याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहाणी केली. तसंच नेमकं किती नुकसान झालं? याची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यात तब्बल ९० हजार हेक्टरवर पुरामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये लोकांच्या शेतातील उभ्या पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे. तसंच अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असून भांडी आणि अन्नधान्य वाहून गेलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.