Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक, इतरत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई'; कोर्टाचा दाखला देत विखे-पाटील स्पष्टच बोलले...

'आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक, इतरत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई'; कोर्टाचा दाखला देत विखे-पाटील स्पष्टच बोलले...
 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदान येथे ५,००० समर्थकांसह बसण्यास सरकारने परवानगी दिली होती. मात्र, या संख्येपेक्षा अधिक आंदोलक सध्या मुंबईत दाखल झाले असून, ते शहरातील विविध ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी गैरवर्तन झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. सोशल मीडियावरही याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, मुंबईकरांना यामुळे गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

मंत्री विखे पाटील यांचा इशारा

"जे आंदोलक आझाद मैदानात बसलेले असतील तेच खरे आंदोलनकर्ते मानले जातील. शहरात इतरत्र फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'आंदोलन बदनाम होऊ नये'
विखे पाटील म्हणाले, "मनोज जरांगे यांना मी सुरुवातीपासूनच विनंती करत आलोय की, आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे. राज्यभरात ५८ मोर्चे काढले गेले, मुंबईत ६-७ लाखांचा मोर्चा झाला, तरी कुठेही अनुशासनभंग झाला नाही. त्याचं स्वागत आणि कौतुक देशभरात झालं. मात्र, या उपोषणाच्या निमित्ताने आलेले काही लोक आझाद मैदानाऐवजी इतर ठिकाणी फिरत आहेत."

"रेल्वे स्टेशनवर गोंधळ, महिलांवरील अवमानकारक प्रकार आणि मुंबईकरांना होणारा त्रास यावर हायकोर्टानेही नाराजी व्यक्त केली आहे. जर कोणी समाजकंटक म्हणून आंदोलनात सहभागी होत असेल आणि त्यामुळं आंदोलन बदनाम होत असेल, तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणारच, असाही इशारा विखे पाटील यांनी दिला.
'आझाद मैदानातच थांबा'

"ज्यांना खरंच आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी आझाद मैदानातच थांबावे. अन्यत्र फिरणारे लोक हे आमच्या आंदोलनाचे भाग नाहीत, असेच समजले जाईल. हायकोर्टाच्या निर्देशानंतर यात सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे," असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.