शाळा, विद्यालयांमध्ये मुलांना ज्ञानाची शिदोरी देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यांच्या बालमनावर संस्काराची पेरणी करत असतात. मात्र याच ज्ञानाच्या मंदिरात अल्पवयीन मुलांना तालिबान्यांप्रमाणे क्रुर शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हरियाणधील हे संपूर्ण प्रकरण असून सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या
समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणातील पाणीपत येथील एका खासगी शाळेत मुलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जटल रोड येथील सृजन पब्लिक स्कूलमध्ये मुलांवर क्रूर वागणूक केल्याचे दोन वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये गृहपाठ न केल्यामुळे दुसऱ्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याला शाळेची मुख्याध्यापिका दोरीने खिडकीला उलटे लटकवून मारहाण केल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये इतर मुलांनाही निर्दयीपणे कानाखाली मारताना दिसत आहे. शाळेच्या परिसरात घडलेल्या या अमानवीय घटनेमुळे बाल सुरक्षा कायदे आणि शैक्षणिक संस्थांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेनंतर शिक्षण मंत्री महिपाल डांढा यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, शाळेला तत्काळ नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. तसेच, शिक्षणमंत्र्यांनी इतर शाळांनाही कठोर चेतावणी दिली असून, मुलांवर मारहाण करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. डीएसपी हेडक्वार्टर सतीश वत्स यांनी माहिती दिली की, दोन दिवसांपूर्वी कुटुंबाकडून तक्रार मिळाली होती. या प्रकरणी पोलीसानी आरोपी ड्रायव्हर अजय आणि स्कूल प्रिन्सिपल रीना यांना ताबडतोब अटक केली आहे.या संपूर्ण घटनेचा खुलासा इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमुळे झाला. चालकाने मुलाला उलटे लटकवतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवर टाकला. हाच व्हिडिओ पालकांपर्यंत पोहोचल्याने प्रकरण तापले. दरम्यान, घटनेनंतर संतप्त झालेले विद्यार्थ्यांचे पालक मॉडल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये जमले आणि त्यांनी मोठा गदारोळ केला. संपूर्ण दोष शालेय व्यवस्थापनाचा असून, फक्त ड्रायव्हरला गोवण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला आणि व्यवस्थापनावरही कठोर कारवाईची मागणी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.