Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 लाखांचे झाले 57 कोटी रुपये... 'या' शेअरमुळे सचिन मालामाल? कंपनी म्हणाली, 'महाराष्ट्र सरकारकडून..'

10 लाखांचे झाले 57 कोटी रुपये... 'या' शेअरमुळे सचिन मालामाल? कंपनी म्हणाली, 'महाराष्ट्र सरकारकडून..'
 

साधारण दीड वर्षांपूर्वी 10 लाख रुपये गुंतवलेल्या व्यक्तीला आज 57 कोटी रुपये परतावा मिळेल एवढी भरमसाठ वाढ झालेल्या एका कंपनीशी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडलुकरचं नाव जोडलं जात आहे. विशेष म्हणजे सचिनच्या नावासहीत या कंपनीसंदर्भात वेगवगेळ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता शेअरबाजारमध्ये मागील 18 महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या कंपनीने सचिन कनेक्शनसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणती आहे ही कंपनी?

आपण ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, आरआरपी सेमीकंडक्टर! या कंपनीने 14 ऑक्टोबर रोजी स्पष्टीकरण दिले की माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्यांच्या कंपनीचे कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नाहीत. तसेच सचिन आमच्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाही, असंही कंपनीने सांगितलं आहे. कंपनीच्या शेअर्सच्या 'किंमतीमधील अभूतपूर्व चढउताराच्या' पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत एप्रिल 2024 पासून 57000 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळेच सचिनने केलेली गुंतवणूक त्याला फार फायद्याची ठरली असा दावा करत या कंपनीसंदर्भातील मजकूर सोशल मीडियावरुन व्हायरल केला जात असतानाच कंपनीने हा दावा खोडून काढला आहे.

कंपनीने मांडले पाच मुद्दे
कंपनीने भांडवली बाजारावरील नियंत्रक असलेल्या 'सेबी'ला असेही सांगितले की त्यांना महाराष्ट्र सरकारकडून 100 एकर जमीन मिळालेली नाही. 'सोशल मीडियामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी अफवा पसरवल्याच्या संदर्भात, आम्ही स्पष्टीकरण देऊ इच्छितो," म्हणत कंपनीने पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

1) दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कधीही आमच्या कंपनीचे कोणतेही शेअर्स घेतलेले नाहीत. सचिन कंपनीचा शेअर होल्डर नाही.
 
2) सचिन तेंडुलकरचा कंपनीच्या बोर्डातील सदस्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तसेच तो कंपनीच्या बोर्डाचा सदस्यही नाही. त्याचप्रमाणे तो कंपनीचा कोणत्याही प्रकारचा सल्लागार नसून असं कोणतंही काम तो आमच्यासाठी करत नाहीये.

3) सचिन तेंडुलकर कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाही.

4) कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून 100 एकर जमीन मिळालेली नाही.

5) कंपनीने बीएसईच्या साइटवर बोर्डसंदर्भातील माहितीचा भाग म्हणून प्रसारित केलेल्या माहितीनुसार, कंपनीची आर्थिक स्थिती पाहता शेअरच्या किमती 10 रुपयांवरून 9 हजार रुपयांपर्यंत गेल्याचा दावा योग्य नाही," असे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

 
सचिनच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचतेय

"कंपनी म्हणून आम्ही असेही सांगू इच्छितो की सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे फक्त 4 हजार शेअर्स डिमॅट मोडमध्ये आहेत. काही व्यक्ती अनैतिक पद्धतीने बाजारात व्यवहार करत आहेत आणि कंपनीच्या आणि कंपनीशी कोणताही संबंध सचिन तेंडुलकरच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहेत," असे आरआरपी सेमीकंडक्टरने पुढे म्हटलं आहे.

सध्या कंपनीचे शेअर्स कितीवर?
गेल्या एका वर्षात आरआरपी सेमीकंडक्टर स्टॉक 13 हजार टक्क्यांनी वाढला आणि एप्रिल 2024 मध्ये कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट झाल्यापासून 57 हजार टक्क्यांनी वाढला, त्यानंतर कंपनीने हे स्पष्टीकरण दिलं आहे. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शेअर बाजारात आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वरच्या सर्किटने 8584 रुपयांवर होता.
कारवाईची तयारी सुरु

'अफवा पसरवणाऱ्या आणि सचिन तेंडुलकरबरोबरच कंपनीची प्रतिष्ठा बदनाम करणाऱ्या संशयित मध्यस्थांविरुद्ध' आवश्यक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.