Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट नोटा रॅकेट; आणखी एकास कोल्हापुरातून अटक:, 6.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त: महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई

बनावट नोटा रॅकेट; आणखी एकास कोल्हापुरातून अटक:, 6.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त: महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई
 

मिरज : कोल्हापुरात पकडण्यात आलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली. अभिजित राजेंद्र पोवार (वय 44, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या एक हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

 
बनावट नोटांची कमिशनवर विक्री करण्यासाठी मिरजेत आलेला सुप्रीत देसाई याला अटक केल्यानंतर बनावट नोटा प्रकरणाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार इब्रार इनामदार, त्याचा साथीदार राहुल जाधव याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. संशयितांनी चहा कंपनीच्या नावाखाली थेट बनावट नोटा छापण्याचा कारखानाच थाटल्याचे उघडकीस आले. यापैकी मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार व नरेंद्र शिंदे या दोघांना दि. 16 पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, हवालदार इब्रार इनामदार याच्यावर पोलिस दलातून तत्काळ विनाचौकशी बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पोलिस कोठडीत असणार्‍या इब्रार आणि नरेंद्र या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांचा अन्य एक साथीदार यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी कबुली दिली. बनावट नोटा तयार करताना खराब झालेल्या बनावट नोटा, नोटांसाठी वापरलेले कागद हे अभिजित पोवार याच्याकडे असल्याची त्यांनी कबुली दिली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक त्याच्या मागावर होते.अभिजित पोवार हा कोल्हापूरमधील गांधीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना लागली. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्यास अटक केली. त्याच्याकडून सहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या 1 हजार 300 बनावट नोटा, अर्धवट बनवलेल्या नोटा, हिरव्या रंगाचे स्ट्रीप बंडल, प्रिंटिंगचे वेस्टेज, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
 
आतापर्यंत पोलिसांनी 98 लाख 42 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. इतक्याच नोटा असल्याचे संशयितांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले होते. परंतु पुढील तपासात आता आणखी सहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत? अन्य कोणाकडे संशयितांनी बनावट नोटा ठेवल्या आहेत का? याचाही तपास आता महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.


मुख्य सूत्रधारांची पोलिस कोठडी आज संपणार

बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार व नरेंद्र शिंदे या दोघांची पोलिस कोठडी आज-गुरुवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. आणखी एका संशयिताचा शोध घ्यायचा असल्याने त्यांची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येईल, पण यापूर्वीच त्यांची कोठडी वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा दोघांना पोलिस कोठडी वाढवून मिळते की, न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते, हे न्यायालयाच्या आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.