बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले आहे. असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूरमध्ये झाला होता. 1967 मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. असरानी यांच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार का करण्यात आले याबाबत माहिती जाणून घेऊयात.
गोवर्धन असरानी हे फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त होते, त्यामुळे त्यांच्यावर आरोग्य निधी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानींवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर असरानींचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी त्यांच्या निधनाची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यामुळे असरानींवर गुपचूप अंत्यसंस्कार का करण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.
असरानींची शेवटची इच्छा
मिळालेल्या माहितीनुसार, असरानी यांना त्यांच्या मृत्यूनंतर कोणताही गोंधळ नको होता. असरानी यांनी मृत्यू पूर्वीच पत्नी मंजू असरानी यांना आपल्या मृत्यूची माहिती कोणालाही देऊ नये असं सांगितलं होते. त्यामुळे कुटुंबाने असरानींच्या मृत्यूची कोणतीही औपचारिक घोषणा न करता गुपचूप त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.
300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये केले काम
गोवर्धन असरानी हे एक विनोदी अभिनेते होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी केलेली शोलेमधील जेलरची भूमिका खूप गाजली. तसेच त्यांनी चुपके चुपके, अनहोनी, आज की ताजा खबर, रफू चक्कर, अमर अकबर अँथनी, छोटी सी बात, आ अब लौट चलें आणि हेरा फेरी सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला.
असरानी सोशल मीडियावर होते सक्रीय
असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय होते. इन्स्टाग्रामवर ते त्यांचे जवळपास साडे सहा लाख फॉलोअर्स होते. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी ते याच मंचावर उत्स्फूर्तपणे शेअर करायचे. अगदी तरुण वयापासूनच त्यांनी सिनेसृष्टीत अभियन करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात साकारलेल्या भूमिकांचे काही व्हिडीओ ते आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर करायचे. निधन होण्याच्या काही तास अगोदरच असरानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. सध्या दिपावलीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.