सांगली : महाराष्ट्राचे वाटोळे 'दगाबाज'ने केले. यांचे किती कारखाने, कुठे कुठे प्रॉपर्टी ठेवली आहे, यांनी सगळे करूनही काहीच सापडले नाही. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात यांच्या नावावर साधी गाडीही नाही. यांची किती विमानं, कोणकोणत्या विमान एजन्सीत गुंतवणूक आहे..!, पण हे कलियुगातील शेवटचे पर्व आहे, जे कराल ते याच जन्मी फेडायचे आहे, आतातरी चांगले वागा, असा घणाघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी नेतृत्वाचे नाव न घेता केला. भाजपच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल, तर याद राखा, खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अनेक नेत्यांनी दिला.
येथील राजमती भवनमध्ये बुधवारी भाजपची ऑनलाईन इशारा सभा झाली. सभेनंतर मानसिक विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात आले. पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने 'दगाबाज' हे पुस्तक जरूर वाचावे. महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले हे समजून येईल. दगाबाजांनी वेळेत शहाणे व्हावे. पूर्वीसारखे तुमच्या गाडीमागे धावणारा समाज आता राहिला नाही. तुमच्या गाडीचा दरवाजा ओढून बाहेर खेचतील. ते म्हणाले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत त्यांनी वार केला, त्यामुळे प्रतिवार होणारच होता. आज झाला आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या पाच प्रकरणांची चौकशी नक्की होईल. प्रसंगी त्यासाठी उच्च न्यायालयातून आदेश मिळवू. सांगली जिल्हा बँक घोटाळ्याची, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांच्या कारभाराची चौकशी होईल. त्याच्या पाठपुराव्याची जबाबदारी सदाभाऊ खोत यांच्यावर राहील. सर्वोदय कारखान्याबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यावर राहील. ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याच्या चौकशीची तड लावण्याची जबाबदारी आमदार सत्यजित देशमुख हे घेतील. ठाण्यात बिल्डरच्या आत्महत्येची फाईल पुन्हा उघडून दोषींपर्यंत जाण्याची जबाबदारी मी घेतली आहे. वाशी मार्केेटमधील घोटाळ्याचीही चौकशी केली जाईल. त्यांना जेलमध्ये जावे लागेल.
टीका खपवून घेणार नाही ः कदम
समित कदम म्हणाले, राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण नेत्यांच्या पत्नीवर खालच्या स्तरावर जाऊन टीका, हे सहन करण्यापलिकडे आहे. या वयात हाडे फार जोडली जात नाहीत, तेव्हा टीका करताना शहाणपणाने करा. गोपीचंद पडळकर हे एकटे नाहीत, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत.
विरोधक दुटप्पी ः गाडगीळ
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, प्रत्येक पक्षाने राजकीय संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. विरोधक संस्कृती वाचवा, म्हणतात, पण खालच्या पातळीवर टीका करतात, हा दुटप्पीपणा आहे.
महिलांचा सन्मान महत्त्वाचा ः खाडे
आमदार सुरेश खाडे म्हणाले, लोकशाहीत टीका जरूर करावी, परंतु महिलांचा सन्मान महत्त्वाचा आहे. माता-भगिनींवर खालच्या पातळीवर शिवीगाळ करणे, यापुढे खपवून घेतले जाणार नाही. पातळी ओलांडू नका.
इट का जवाब, पत्थरसे ः देशमुख
सत्यजित देशमुख म्हणाले, विचारात मतभेद जरूर असावेत, पण व्यक्तीभेद, व्यक्तीद्वेष नसावा. असंस्कृत वक्तव्याची विकृत संस्कृती ठेचून काढली पाहिजे. यापुढे इट का जवाब, पत्थरसे मिलेगा.
आप्पांना दगा दिला ः पवार
पृथ्वीराज पवार म्हणाले, आमदार संभाजी पवार यांनी जयंत पाटील यांना सांगलीत महापालिकेची सत्ता मिळवून दिली. पण त्यांनाच दगा दिला. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यावर जयंत पाटील यांनी खोट्या केसेस दाखल करायला लावल्या. 'महांकाली'चे तत्कालीन अध्यक्ष विजय सगरे यांना मनस्ताप दिला. माजी मंत्री दिलीप कांबळे, अमर साबळे, स्वाती शिंदे, प्रकाश ढंग यांचे भाषण झाले. यावेळी शेखर इनामदार, नीता केळकर, भारती दिगडे, दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, डॉ. रवींद्र आरळी, भीमराव माने, शिवाजी डोंगरे, विश्वजित पाटील, संदीप गिड्डे, सविता मदने, गीतांजली ढोपे-पाटील, संगीता खोत, राजाराम गरूड, अॅड. चिमण डांगे, केदार खाडिलकर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.