ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला
बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन दिवाळीतच आघाडीत बिघाडीचे फटाके फुटले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती
मोर्चा अर्थात झामुमो पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. बिहारमधील
विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, सहा मतदारसंघांमध्ये पक्षाचे
उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या
नेत्यांनी शनिवारी ही घोषणा केली.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी इंडिया आघाडीत अद्याप काही जागांवरून वाद सुरू आहेत. हा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही, त्यात झारखंडमधील सत्ताधारी पक्ष आणि इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष झामुमोने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा इंडिया आघाडीला तगडा झटका असल्याचे मानले जात आहे.झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस आणि प्रवक्ता सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, पक्षाने बिहार विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहोत. चकाई, धमदाहा, कटोरिया (एसटी), मनिहारी (एसटी) आणि जुमई आणि पीरपैंती या जागांवर झामुमोचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. दरम्यान या मतदारसंघांसाठी दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
JMM कडून स्टार प्रचारकांची घोषणा
बिहार
विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चानं २० स्टार प्रचारकांची यादी
जाहीर केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्टार प्रचारकांचं
नेतृत्व करतील. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, झारखंड
मुक्ती मोर्चानं इंडिया आघाडीकडं काही जागांची मागणी केली होती. पण जागा
दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळं पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.