नागपूर: नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला हल्ला बनावट होता, असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे. न्यायवैद्यक चाचणीचा हवाला देत ग्रामीण पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात 'बी समर' अहवाल दाखल केला आहे.
या हल्ल्याची तक्रार अनिल देशमुख यांनी केली होती. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी देशमुख त्यांच्या कारमध्ये बसून नरखेड येथून काटोलला जात होते. दरम्यान, बैलफाटा परिसरात चार जणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यामुळे देशमुख यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोर देशमुख यांच्या विरोधात आणि भाजपाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थनात नारे देत फरार झाले असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. निवडणुकीचा काळ असल्यामुळे या आरोपाने राजकीय वातावरण तापले होते.तपासादरम्यान ग्रामीण पोलिसांना देशमुख यांच्या कारमध्ये दोन दगड मिळून आले. एक दगड बोनटवर, तर दुसरा दगड कारच्या आतमध्ये होता. ते दगड न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठविण्यात आले. तसेच घटनेची पुनरावृत्ती करून पाहण्यात आली. त्यावरून हल्ल्याची घटनाच घडली नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशमुख यांच्या कारला रिइनफोर्स काच लागली होती. सतत दगड मारल्यावरच ती काच तुटू शकते. तसेच देशमुख यांची जखम दगडामुळे झाली नाही. कारमधील दगड मागच्या काचेतून आत आला होता. तो दगड देशमुख यांच्या कपाळाला लागू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काय म्हणाले अनिल देशमुख?
दरम्यान, न्यायवैद्यक विभागाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, काचेवर दगड फेकले गेले आणि त्या काचेचा तुकडा लागल्यामुळे कपाळावर जखम झाली. यात पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. ही बी समरी आहे, सी समरी नाही. बी समरीचा अर्थ पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. या घटनेला सुरुवातीपासून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपी सापडले नाहीत म्हणून ए समरी रिपोर्ट सादर करायला हवा होता. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये अनिल देशमुखांच्या कारवर २ इसमांनी दगड मारल्याने जखमी झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही पुढील कार्यवाही योग्य करू असं त्यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.