नीलेश घायवळच्या घरात 'ॲम्युनिशन बाॅक्स'; पोलिसांकडून खडकीतील दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार
पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळ याच्या कोथरूडमधील घराच्या झडतीत काडतुसे, तसेच पुंगळ्यांसह काडतुसे ठेवण्याचे लाकडी खोके (ॲम्युनिशन बाॅक्स) सापडले आहे. खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील हे खोके घायवळपर्यंत कसे पोहाेचले?
यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घायवळ याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळ याच्याविरुद्ध आता सात गुन्हे दाखल झाले आहेत. तो सध्या युराेपात असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संस्थेशी (इंटरपोल) संपर्क साधण्यात आला आहे. घायवळला पकडण्यासाठी 'ब्ल्यू काॅर्नर' नोटीस बजाविण्यात आली आहे.
त्याचे कोथरूडमधील श्री संत ज्ञानेश्वर काॅलनीत घर आहे. त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या घरात काडतुसे ठेवण्याचे खोके सापडले आहे. हे खोके खडकीतील दारूगोळा कारखान्यातील असल्याचा संशय आहे. हे खोके रिकामे आहे. मात्र, हे खोके त्याच्यापर्यंत कसे पोहाेचले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. याबाबत दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.काडतुसे ठेवण्याच्या खोक्यावर २०१७ वर्ष असा उल्लेख आहे. खोक्यावर ५.५६ एमएम असे लिहिण्यात आले आहे. पोलिसांनी खोक्याची तपासणी केली. तेव्हा खोक्यात सत्तुर सापडला आहे. त्यात काडतुसे नव्हती. या खोक्यात एकावेळी ३०० काडतुसे बसतात, असी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील खोके घायवळच्या घरापर्यंत कसे पाोहोचले, यादृष्टीने तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.