प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील वादात सापडली आहे. गौतमीच्या मालकीच्या गाडीने एका रिक्षाला उडवल्याने रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली असून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. असं असतानाच दुसरीकडे गौतमीचे डान्सचे कार्यक्रम सुरुच आहेत. मात्र पहाटेच्या सुरामास झालेल्या या अपघाताचे काही नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यातून धक्कादायक खुलासा झाला आहे.
नेमकं घडलं काय?
गौतमी पाटीलच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धायरीमधील गारमळा येथील उज्वल दीप सोसायटीत राहणारा 44 वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय 32) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?
दरम्यान, गौतमी पाटीलच्या कारच्या या अपघातच्या काही मिनिटं आधीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यामधून एक बाब स्पष्ट झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये गौतमीच्या गाडीमधून केवळ दोघेजण खाली उतरताना दिसत आहेत. त्यामुळे गाडीत केवळ चालकच असल्याच्या विधानाला पुष्टी मिळाल्याचं सांगितलं जात आहे. अपघात झाला तेव्हा गौतमी गाडीत नव्हती हे आधीच स्पष्ट झालं. मात्र जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी गौतमी पाटीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटलांचा फोनही चर्चेत
या प्रकरणामध्ये दाद मागण्यासाठी जखमी रिक्षाचलक विठ्ठल मरगळेची मुलगी आणि नातेवाईक चंद्रकांत पाटलांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी नातेवाईकांसमोरच पोलिसांना फोन लावून या प्रकरणाची माहिती घेऊन काही सूचना केल्या. "हा, त्या गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?" असा पहिला सवाल चंद्रकात पाटलांनी फोन कॉलवर पोलीस अधिकाऱ्याला विचारला.त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी, "अरे पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? आता हा रिक्षावाला सिरीअर आहे. तुम्ही म्हणालात गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राइव्ह करत होतं की भूत ड्राइव्ह करत होतं? तो जो कोण ड्रायव्हर आहे त्याला पकडायला लागेल ना? पकडला? केस दाखल केली?" असं विचारलं. पोलिसांनी समोरुन सर्व घडामोडीची माहिती दिली. चंद्रकांत पाटलांनी हा फोन पुण्याच्या पोलीस उपायुक्तांना केल्याची माहिती मिळत आहे. पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी, "बरं मग तो कुठे आहे आता? मग त्याची गाडी कुठे आहे? गाडी जप्त करुन टाका," अशी सूचना पोलिसांना केली.
सर्व खर्च गौतमीने करावा अशी ऑफर?
"त्या गाडीची मालक गौतमी पाटील असेल तर तिला नोटीस द्या! त्या बिचाऱ्याची मुलगी समोर येऊ बसली आहे. तुम्ही काय करा, गौतमी पाटीला म्हणा की तू त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च तरी कर. तुम्ही लक्ष घाला या प्रकरणात," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.