'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा
नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि संघ परिवारावर जोरदार टीका केली आहे. "जर कोणी 'I Love Modi' म्हणालं तर त्याचं कौतुक केलं जातं; पण जर कोणी 'I Love Mohammad' म्हटलं तर त्यावर आक्षेप घेतला जातो. मग, या देशातील धार्मिक स्वातंत्र्य कुठं आहे?" असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. ओवेसी संभल येथील मशिदीच्या वादाचा
संदर्भ देत म्हणाले की, "आज मुस्लिमांची धार्मिक स्थळं काढून घेतली जात
आहेत, त्यांची ओळख डावलली जात आहे. आम्ही मुस्लिम फक्त पैगंबर मोहम्मद
यांच्या मुळे आहोत, आणि त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं गुन्हा नाही."
पोलिसांवरही हल्लाबोल
पोलिसांच्या कारवाईवर निशाणा साधत ओवेसी म्हणाले की, "काही व्हिडिओंमध्ये पोलिस लाठीमार करताना दिसतात, तर काही ठिकाणी दुकानदार त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. पोलिस फक्त सत्ताधाऱ्यांचे सेवक झाले आहेत. सत्ता बदलली की हेच पोलिस सामान्य लोकांवर अन्याय करतात." त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "आदराने पैगंबर मोहम्मद यांचं नाव घेणं गुन्हा का मानला जातो?" ओवेसी यांनी लोकांना कायदा हातात न घेण्याचं आवाहन करत शांततापूर्ण लढ्याचा संदेशही दिला.
आरएसएसवर थेट निशाणा
आरएसएसच्या
१०० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी संघाच्या योगदानाचं कौतुक केलं. मात्र, त्यावर पलटवार करत ओवेसी
म्हणाले की, "पंतप्रधान खोटं बोलतात. स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचा कोणताही
ठसा नाही. त्यांच्या कोणत्याही सदस्याने प्राण दिले नाहीत, तुरुंगवास भोगला
नाही." ते पुढे म्हणाले, "जगाला माहिती आहे की पंतप्रधान सत्य बोलत नाहीत.
संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार दांडी मार्चमध्ये गेले होते, पण त्यांचा
उद्देश केवळ स्वातंत्र्यसैनिकांना संघाकडे आकर्षित करणं हा होता.
स्वातंत्र्य चळवळीत संघाचा सहभाग इतिहासात कोठेही नोंदवलेला नाही."
राजकीय वादाला तोंड
ओवेसींच्या या विधानामुळे पुन्हा एकदा संघाच्या भूमिकेबाबत वाद निर्माण झाला आहे. धार्मिक स्वातंत्र्य, मशिदीवरील वाद आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या संघाच्या योगदानाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.