Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी काढले महत्वाचे आदेश; निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, अर्ज भरणे अन् बरंच काही...

आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी काढले महत्वाचे आदेश; निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, अर्ज भरणे अन् बरंच काही...


राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी राज्य निवडणूक आयोगाने जोरदारपणे केली आहे. पुढील काही दिवसांतच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे संकेत आयोगाने दिले असून आज सर्व महापालिका आयुक्तांसाठी महत्वाचे आदेश काढले आहेत. निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता, अर्ज भरणे, मागे घेणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबींसाठी सज्ज राहण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने आज सर्व २९ महापालिकांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणुका मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नियोजन करावे. निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी यांचा आढावा घेऊन आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांची बदली किंवा पदस्थापना करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. 
मुंबईत १० ते १२ प्रभांसाठी एक तर इतर महापालिकांसाठी शक्यतो ३ प्रभागांसाठी व अपवादात्मक परिस्थितीत ४ प्रभांगासाठी एक याप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करायची आहे. यांसह इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही आयोगाने आयुक्तांना आदेश दिले आहेत.

मतदान केंद्रांची संख्या व त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहे. त्यांना सर्व आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही आयोगाने केल्या आहेत. उमेदवारी अर्ज, शपथपत्र व इतर नमुने आणि माहितीपुस्तिका तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मतदान केंद्रांची संख्या, प्रत्येक केंद्रावरील मतदार संख्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबतही आयोगाने आदेशात स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मतदान साहित्य व निवडणुकीशी संबंधित इतर साहित्य वेळेत उपलब्ध करून घ्यावे, स्ट्राँग रूमची व्यवस्था, मतमोजणीसाठी उपाययोजना करण्याबाबतही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमबजावणीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग व इतर संबधित विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित महत्वाच्या सुचना आयुक्तांना देत सज्ज राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच महापालिका निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व महापालिकांमधील निवडणुकांच्या तयारीचा अंतिम आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.