Big Breaking! सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या अथक प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली जिल्ह्यातील शिवरवाडी (ता. शिराळा) येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्स व रेस्क्यू टिमला अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले.
शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरात बिबट्या असल्याचे आढळल्यानंतर हुसकावून लावले होते. आज सकाळी सात वाजता अशोक बेंदरे याचे भाऊ नाथा बेंदरे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पाइप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले. सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे.
दीड तासांच्याअथक प्रयत्नांनंतर बिबट्या सापळ्यात जेरबंद
त्यांनी गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक, सहदेव, पोपट व दगडू बेंदरे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पाने लावून बंद केलेव वन विभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तासाभराने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा, जाळी घेऊन शिवरवाडीत पोहोचले. घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले. परंतु, बिबट्याने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर बांबू, चिवे व काठ्यांच्या साहाय्याने ढकलून दीड तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले.
गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची झुंबड उडाली
बिबट्याची पकड मोहीम पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंदरे, पोलिस पाटील मोहन घागरे, पणुंब्रे तर्फ शिराळा सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, अनंत सपकाळ, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंदरे आदींचा समावेश होता. वन विभागामार्फत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनूस मणेर, मानव सुरले, शंतनू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.