Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षकांना मोठा दिलासा! 'माध्यमिक'च्या पटसंख्येची अट होणार शिथिल; शिक्षकांअभावी शाळा बंद पडणार नाहीत; समायोजनापूर्वी बदल शक्य

शिक्षकांना मोठा दिलासा! 'माध्यमिक'च्या पटसंख्येची अट होणार शिथिल; शिक्षकांअभावी शाळा बंद पडणार नाहीत; समायोजनापूर्वी बदल शक्य


सोलापूर : इयत्ता नववी व दहावीच्या ज्या वर्गात २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, तेथील शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन होणार आहे. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील २२ शाळासंह राज्यातील ६०० हून अधिक शाळा बंद होतील, अशी २०२४-२५ वर्षातील स्थिती आहे. याविरुद्ध शिक्षक व मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पटसंख्येच्या निकषात बदल केला जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.


२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. सध्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांची पटसंख्या पहिल्यांदा २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पुढील दहा दिवसांत खासगी प्राथमिक शाळांची व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचीही पटसंख्या याच दिवसात पूर्ण होणार आहे. या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होईल. सुरवातीला त्याच शाळेत, त्याच तालुक्यात, जिल्ह्यात समायोजन होईल. त्यानंतर विभागात आणि शेवटी राज्यात कोठेही त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. दरम्यान, नववी व दहावीच्या ज्या वर्गातील विद्यार्थी २० पेक्षा कमी आहेत, तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या निर्णयात समायोजनापूर्वी बदल होण्याची शक्यता असून त्याचा शासन निर्णय डिसेंबरअखेर अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

यापूर्वीच शासनाला पाठविला प्रस्ताव

२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाचा शासन निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर समायोजनाची कार्यवाही होईल. पण, संचमान्यतेसाठी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या निकषात बदल करावा, असा प्रस्ताव शासनाला यापूर्वीच पाठविला असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.

- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे

आठवी ते दहावीपर्यंत तीन शिक्षक
आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी विज्ञान, गणित व इंग्रजी या तीन विषयांसाठी शिक्षक आवश्यकच आहेत. तीन शिक्षक व एक मुख्याध्यापक अशा शाळांमध्ये आवश्यक आहे. विषय शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. पटसंख्येच्या निकषांमुळे अनेक शाळा बंद पडून शाळाबाह्य विद्यार्थी वाढू शकतात, त्यामुळे पटसंख्येच्या निकषात बदल करावा, असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यानुसार पटसंख्येच्या निकषात बदल होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.