एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे एससी प्रमाणपत्र जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलीय. शिक्षणाशी संबंधित आवश्यकता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं हा दुर्मीळ निकाल दिला. पाँडिचेरीतील एका मुलीला तिच्या आईच्या आदि द्रविड जातीच्या आधारे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिलीय. सर्वोच्च न्यायालयात वडिलांच्या जातीला मुलाची जात मानण्याच्या परंपरागत नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत. त्यावर अद्याप अंतिम निकाल देण्यात आलेला नाही. अशा स्थितीत आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्यानं आईच्या जातीच्या आधारे मुलीला एससी प्रमाणपत्र देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, आम्ही कायद्याच्या प्रश्नाला सध्या बगल दिलीय पण मुलीच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये.
सरन्यायाधीशांनी म्हटलं की, बदलत्या काळात आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र का जारी केलं जाऊ नये? सरन्यायाधीशांच्या या विधानामुळे भविष्यात जरी वडीलांची जात वेगळी असेल तरी त्या मुलांनासुद्धा एससी प्रमाणपत्र मिळू शकतं ज्यांची आई एससी जातीची आहे. मुलीची आई हिंदू आदि द्रविड जातीची आहे. तिने तिन्ही मुलांसाठी एससी प्रमाणपत्राची मागणी केली होती. लग्नानंतर पती माझ्या माहेरीच राहतो. मुलंही इथंच शिकले आणि कुटुंबातील सर्वच सदस्य हे अनुसूचित जातीचे आहेत. पण एसी प्रमाणपत्र देताना वडीलांची जात आणि त्यांचा पत्ता हा प्राथमिक आधार मानला जातो.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर कायद्याचा प्रश्न बाजूला ठेवून निकाल दिला. तर सरन्यायाधीशांनी आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र का देऊ नये असं केलेलं विधान हे भविष्यात जात निश्चित करण्याच्या नियमात मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते. ज्या कुटुंबांमध्ये आई एससी, एसटी समुदायातून आहे आणि मुलं त्याच सामाजिक वातावरणात लहानाची मोठी झाली आहेत त्यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.