पुणे : मिळकतकर थकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेमुळे अनेक करदाते महापालिकेस थकबाकी भरत नाहीत. त्यांच्याकडून या दंडाच्या रकमेत सवलत देण्याची मागणी केली जात आहे, असे सांगत महापालिका प्रशासनाकडून अभय योजना सुरू केली आहे.
मात्र, या योजनेची माहिती थकबाकीदारांना व्हावी, यासाठी आता पालिकेकडून जनजागृतीसाठी कोटीभर रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यात रेडिओ, तसेच होर्डिंग्जसह, वेगवेगळ्या माध्यमांतून जाहिराती केल्या जाणार आहेत. त्यामुळे आधी थकबाकीदारांच्या नावाखाली योजना प्रस्तावित करणाऱ्या प्रशासनावर जनजागृती करण्याची वेळ आली आहे.
महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी सुमारे १३ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे नियमित थकबाकीदार असलेल्या सुमारे साडेचार लाख थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना प्रस्तावित केली असून, त्यातून महापालिकेस सुमारे साडेतीन हजार कोटींच्या महसूलची अपेक्षा आहे. ही योजना १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे.मात्र, योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २४ हजार थकबाकीदारांनी १२५ कोटी रुपये महसूल जमा केला आहे. त्यामुळे योजनेच्या ६० दिवसांमधील १५ दिवसांत अवघ्या ५ टक्के थकबाकीदारांनीच कर भरला आहे. त्यामुळे महापालिकेस अपेक्षित असे उत्पन्न अद्यापही मिळालेले नाही.ही बाब लक्षात घेऊन आता पुढील दीड महिना महापालिकेकडून अभय योजनेची जनजागृती करून थकबाकीदारांना योजनेची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी निविदा न काढता कामे करण्यास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे.
मेसेज, नोटिसांना केराची टोपली
महापालिकेकडून ही योजना सुरू होताच त्याची माहिती सर्व थकबाकीदारांना मेसेजद्वारे देण्यात आली होती, तसेच त्यांना नोटिसाही पाठविल्या होत्या. याशिवाय कर संकलन विभागाकडून फोनद्वारेही ही माहिती देण्य़ात आली आहे. त्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने आता प्रशासन जाहिरातींसाठी तब्बल १ कोटींचा खर्च करणार आहे.
ही योजना सुरू केल्यानंतर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून थकबाकीदारांचे स्वागत केले होते. त्यावरून महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता ज्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांनाच ही माहिती नसल्याने पुन्हा जनजागृतीवर कोटीभर रुपयांची उधळपट्टी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.