कुपवाड : 'मी या ठिकाणचा दादा आहे. तुला माहीत नाही का? माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करशील तर एकेकाला गोळ्या घालीन,' अशी धमकी देत जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यामधून सहा हजारांची रोकड लांबविणाऱ्या सराईतावर सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला.
सुनील बाबासो दुधाळ (बजरंगनगर, कुपवाड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यासोबत अन्य एका अनोळखीचा गुन्ह्यात समावेश आहे. याबाबतची फिर्याद अभिजित सुनील सरगर (वय ३३, स्वामी मळा, कुपवाड) यांनी दिली. त्यानुसार दोघा संशयिताविरुद्ध कुपवाड पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापैकी पसार संशयिताचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी हे हॉटेल एसडीमध्ये मॅनेजर आहेत. शुक्रवारी (ता. ५) संशयित सुनील दुधाळ याने हॉटेलमध्ये येऊन मॅनेजरला, 'मी या ठिकाणचा दादा आहे. तुम्हाला माहीत नाही का? माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार द्याल तर एकेकाला गोळ्या घालेन,' धमकी देऊन हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ केली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील ६,००० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन दुधाळ, तसेच त्यासोबत असणाऱ्या एक अनोळखी हे दोघेही दुचाकीवरून निघून गेले. यानंतर फिर्यादींनी कुपवाड पोलिस ठाणे गाठले.याची दखल घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदाराव घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस योग्य तपास करत कारवाईची सूचना दिली. त्यानुसार पोलिसांनी आज संशयित दुधाळ यास ताब्यात घेतले. दुधाळ सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहत. २०१४ ला त्याच्यावर 'मोका'अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. उपनिरीक्षक अमोल थोरात अधिक तपास करीत आहेत.
व्यावसायिक, नागरिकांना आवाहन
कुपवाड पोलिस ठाण्याकडून व्यावसायिकांना व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही व्यक्तीकडून त्यांना धाक, खंडणी किंवा इतर पैशाची मागणी अशा प्रकारचा त्रास उद्भवत असल्यास न घाबरता पोलिसांत तक्रार करावी. त्रास देणारा कितीही बडा दादा असूदे, प्रथम पोलिसी खाक्या दाखवू, मगच कायदेशीर बंदोबस्त करू.
सहाय्यक निरीक्षकांनी केली भर चौकात धुलाई
गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी संशयित दुधाळ यास ताब्यात घेतले. त्याला कारवाईसाठी वाहनातून कुपवाड पोलिस ठाण्यात नेले जात होते. यावेळी मुख्य चौकात येताच असतानाच सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी चालकाला वाहन थांबवण्याचा इशारा केला. वाहन थांबताच संशयितास खाली उतरवून घाडगेंनी त्याची भर चौकात धुलाई सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवत दहशत मोडीत काढली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.