सतत सुरू असलेल्या ऑपरेशनल समस्यांमुळे देशभरातील हवाई वाहतूक गुरुवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर झाला आहे. पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बेंगलोरकडे जाणाऱ्या विमान प्रवासासाठीचे तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. दहापट दराने तिकिटांची विक्री सुरू असल्याने प्रवाशांना आर्थीक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
इंडिगोच्या उड्डाणांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. कंपनीला भेडसावत असलेल्या गंभीर ऑपरेशनल समस्येमुळे अनेक उड्डाणे उशिरा होत असून मोठ्या संख्येने विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे. गुरुवारी देशभरातून तब्बल ६०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मागील दिवसांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका तिकीट दरांना बसला आहे.पुणे-मुंबई मार्गाचे तिकीट तब्बल ६१ हजार रुपयांवर गेले असून पुणे-दिल्लीचे तिकीट २७ हजार रुपये झाले आहे. तर पुणे-बेंगलोर मार्गासाठी प्रवाशांना तब्बल ४९ हजार रुपये मोजावे लागत आहेत. इंडिगोची उड्डाणे मोठ्या प्रमाणात रद्द झाल्याने बाजारात उपलब्ध सीट्स कमी पडल्या आणि इतर विमान कंपन्यांनी दर वाढवले. उड्डाणे रद्द होणे, वारंवार वेळ बदलणे आणि अव्वाच्या सव्वा तिकीट दरामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हवाई वाहतूक सुरळीत कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.