इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध 'कॅफे अड्डा इचलकरंजी' येथे निर्भया पथकाने आज सायंकाळी अचानक टाकलेल्या छाप्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला. कॅफेमध्ये जोडप्यांना 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली उपलब्ध करून दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कॅफे मालक व व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
मालक संकेत शिवपुत्र हुबळे (वय २५, रा. कोरोची) आणि व्यवस्थापक शैलेश अनिल चंदुरे (वय २६, रा. शेळके मळा) अशी आहेत. कारवाईदरम्यान कॅफेमध्ये काही तरुण-तरुणी आढळून आले. त्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोस्कर यांनी दिली. शहरात शाळा, कॉलेज परिसरात गेल्या काही वर्षांत कॅफेंची संख्या झपाट्याने वाढली असून काही ठिकाणी बेकायदेशीर, अश्लील आणि संशयास्पद कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार,आज सायंकाळी निर्भया पथकातील अधिकारी तोतया ग्राहक म्हणून 'कॅफे अड्डा'मध्ये शिरले. यावेळी कॅफेमध्ये जोडप्यांसाठी दोन 'स्पेशल रूम', वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र रूम, शेकडो रुपयांत गोपनीय खोली भाड्याने देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. छापा पडताच उपस्थित जोडप्यांची एकच धांदल उडाली. काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनींसह बाहेरून आलेले ग्राहकही येथे आढळले. या विशेष रूममध्ये आणि परिसराची झडती घेतल्यावर तिथे कंडोमची पाकिटे पोलिसांना आढळली.याप्रकरणी 'कॅफे अड्डा'चे मालक संकेत हुबळे आणि चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोस्कर, महादेवी पुजारी, प्रियंका चौगुले, सिद्धार्थ शेटे आदींच्या पथकाने केली.
'कॅफे अड्डा'वरील छाप्यात निर्भया पथकाला धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. तपासात बाथरूममध्येच अश्लील कृत्यांसाठी अनुकूल वातावरण तयार केलेले, कॅफेची बाहेरील दारे बंद करून 'गोपनीय' प्रवेशमार्ग ठेवलेला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा मुद्दाम बदललेली असल्याचे निष्पन्न झाले. कॅफेमध्ये जोडप्यांसाठी विशेष रूम उपलब्ध करून देत गैरवर्तन करून बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.