जात कळताच स्टेशन मास्तर मागं सरकला, टांगेवाल्यानं नाकारलं, पाणी दिलं नाही... अस्पृश्यतेचा तडाखा बसलेला बाबासाहेबांच्या बालपणीचा 'तो' वेदनादायी प्रवास
आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक आणि देशातील महान राजकारण्यांमध्ये अग्रगण्य असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे जातीय विषमतेविरुद्धचा एक महासंग्राम होता. लहानपणापासूनच जातीय भेदभावाचे शिकार ठरलेल्या बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य मागासलेल्या समाजाला अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी वेचले. आज 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन... या दिना निमित्तानेच त्यांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला आणि त्यांच्या पुढील कार्याची दिशा निश्चित केली. त्यांच्या लक्षात आले होते की, देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग 'मागासलेला' मानला जात असल्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवला जात आहे. त्यांनी कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक जातीच्या लोकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
बालपणीचा 'तो' हृदयद्रावक अनुभव
क्रिस्तोफ जाफ्रलो यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या चरित्रानुसार, त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग त्यांच्या जीवनातील सर्वांत मोठा टर्निंग पॉइंट ठरला. लहानपणी भीमराव आपल्या भावासोबत वडिलांना भेटायला निघाले होते. त्यांचे वडील ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई होते. रेल्वेने प्रवास करुन ते जेव्हा स्टेशनवर उतरले, तेव्हा स्टेशन मास्तरने त्यांना जवळ बोलावून काही चौकशी केली. मात्र, त्यांना भीमरावांच्या जातीबद्दल कळताच स्टेशन मास्तर पाच पाऊले मागे सरकला. या क्षणाने लहानग्या भीमरावांना अस्पृश्यतेचा अर्थ स्पष्ट केला. अस्पृश्यतेचा हा पहिला तिखट अनुभव त्यांच्या मनावर बिंबला. रेल्वे स्टेशनवरुन पुढे वडिलांच्या छावणीपर्यंत जाण्यासाठी त्यांनी घोडागाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची जात कळताच टांगावाल्याने त्यांना गाडीत बसवून घेऊन जाण्यास नकार दिला. कोणीही आपली गाडी 'अस्पृश्य' मुलांना बसवून अपवित्र करु इच्छित नव्हते.बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एका टांगेवाल्याने एक अट ठेवली. तो म्हणाला की, तो त्यांना घेऊन जाईल, पण मुलांना स्वतः टांगा चालवावा लागेल आणि टांग्याचे भाडे दुप्पट द्यावे लागेल. कोणताही पर्याय नसल्यामुळे भीमरावांनी स्वतः टांगा चालवला आणि ते वडिलांच्या दिशेने निघाले. प्रवासात एका ठिकाणी टांगेवाला खाली उतरला आणि एका ढाब्यावर जेवायला करण्यासाठी गेला. मात्र, भीमरावांना ढाब्याच्या आतमध्येही प्रवेश दिला गेला नाही. त्यांना प्रचंड तहान लागली होती, परंतु अस्पृश्य असल्यामुळे त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळू शकले नाही. शेवटी, त्यांना जवळच वाहत असलेल्या एका रेताड प्रवाहातून वाकून पाणी पिऊन आपली तहान शांत करावी लागली.
शिक्षणाची प्रेरणा आणि पुढील वाटचाल
जातीय भेदभावाचा आणि अस्पृश्यतेचा हा भीषण अनुभव लहानग्या भीमरावांच्या मनात एक तीव्र घाव करुन गेला. त्यांना स्पष्टपणे समजले की, ही असमानतेची भिंत जर पाडायची असेल, तर त्यावर शिक्षणाची 'धार' मारणे अत्यंत आवश्यक आहे. हा अनुभव त्यांच्या जीवनातील सामाजिक न्यायाच्या लढ्याची मूळ प्रेरणा ठरला. या अनुभवातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षणाला आपले मुख्य शस्त्र बनवले. त्यांनी मुंबईतून मॅट्रिक्युलेशन पूर्ण केले आणि नंतर शिष्यवृत्ती मिळवून बी.ए. ची पदवी घेतली.
त्यानंतर बडोद्याच्या महाराजांकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या जोरावर ते अमेरिका आणि नंतर लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले. त्यांनी मिळवलेल्या प्रचंड शैक्षणिक यशामुळे त्यांनी इंग्रजांचे लक्ष वेधून घेतले आणि ते जगातील एक विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या विद्वत्तेमुळेच त्यांना पुढे देशाच्या राजकारणात आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून मोठे स्थान मिळाले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनुभवलेल्या या संघर्षानेच त्यांना दलितांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी समाजाला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.