लोणी काळभोर, दि. 6: पुणे ग्रामीण पोलीस दलातील निखिल कैलास रणदिवे या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पोलीस कर्मचाऱ्याचा फोन बंद असून, पुणे ग्रामीण पोलीस दलात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निखील यांची पत्नी अक्षदा रणदिवे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून "मला लहान मुलगी आहे, मला माझा नवरा आणून द्या" अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
मला लहान मुलगी आहे, माझा नवरा मला आणून द्या; अक्षदा रणदिवे
रणदिवे यांचा फोन गुरुवारपासून बंद असूनही, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या शोधाची तात्काळ दखल न घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. निखिल रणदिवे यांची पत्नी अक्षदा रणदिवे यांच्या म्हणण्यानुसार, निखील हे गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. 1 वर्षापासून बदली होऊनही त्यांना यवत पोलिस ठाण्यातून मुक्त करण्यात आलेले नाही. बाहेरगावी पाठवून परत आल्यानंतर पुन्हा लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात होते. याच त्रासाला कंटाळून ते गायब झाले आहेत. जो पर्यंत ते येत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्याच्या बाहेर जाणार नाही. "मला लहान मुलगी आहे, माझा नवरा मला आणून द्या" असे त्यांच्या पत्नीने पोलीस प्रशासनाकडे विनंती केली आहे.दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निखिल कैलास रणदिवे (वय अंदाजे 32) यांनी हे पाऊल उचलण्यापूर्वी यवतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गेली एक वर्ष मानसिक छळ केल्याचा आणि बदली असूनही कार्यमुक्त न केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. रणदिवे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे बंधू अक्षय रणदिवे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. रणदिवे यांनी लिहिलेली सुसाईड नोट आणि सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
लेकीला लिहिलेली शेवटची हृदयद्रावक चिठ्ठी
बेपत्ता होण्यापूर्वी रणदिवे यांनी आपल्या WhatsApp स्टेटसवर स्वतःच्या फोटोसह 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे लिहून एक हृदय हेलावून टाकणारा संदेश पोस्ट केला. हा संदेश त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून लिहिला होता. यात ते म्हणाले, "माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस, पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. चार-पाच दिवसांपूर्वी तू आजारी होतीस, पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला रुग्णालयात घेऊन जाता आले नाही."
वरिष्ठ अधिकाऱ्यावर थेट आरोप
"यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेल्या 1 वर्षापासून सतत त्रास देत आहेत. माझा नाइलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करून घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा !" असं त्यांनी यात म्हटलं आहे. याशिवाय, रणदिवे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, "देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस नारायण देशमुख जबाबदार आहेत."
बदली थांबवणे आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप
रणदिवे यांची सन 2025 मध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्यात सर्वसाधारण बदली झाली होती. मात्र, देशमुख यांनी त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास देणे सुरूच ठेवले, असा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी रणदिवे यांनी वरवंड येथे गुटख्याची मोठी कारवाई केली होती. हा गुटखा एका राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यावसायिकाचा होता. यानंतर देशमुख यांनी रणदिवे यांना बक्षीस देण्याऐवजी त्यांची केडगाव चौकीला बदली केली आणि त्यांना वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली.
यवत पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजातील चर्चांनुसार, वरिष्ठ निरीक्षक देशमुख कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलतात, त्यांना कार्यालयात दोन-दोन तास उभे ठेवतात. त्यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून वरिष्ठांचा कुठल्याही आदेशाशिवाय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बंद न दिल्याचाही आरोप आहे.पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने यापूर्वीही तत्कालीन जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला होता. मात्र, तेव्हाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. "तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी आवर घातला असता, तर देशमुख इतके बेफान सुटले नसते," अशी चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.
रणदिवे यांच्या शोधासाठी यवत, शिक्रापूर परिसरात विशेष पथके काम करत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याच्या गंभीर आरोपांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.