''पार्थ पवारांवर अजून गुन्हा का दाखल नाही?'', हायकोर्टाने स्वतःहून विचारलं; ''हे तेच का उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव..''
मुंढवा जमीन प्रकरणात पोलिसांनी शीतल तेजवानीला ३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तेजवानीच्या वकिलांनी दुसऱ्या एफआयआरसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वतःहून पार्थ पवारांबद्दल सरकारी पक्षाकडे विचारणा केली.
शीतल तेजवाणीने अटकेनंतर ८ तारखेला सेशल कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने त्यावर नोटीसही इश्यू केली होती. मात्र सुनावणीची वाट न बघता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना एवढी घाई करण्याची गरज काय होती? असं विचारलं. त्यावर ही याचिका मागे घेण्याचेही निर्देश दिले, नाहीतर दंड होईल, असं कोर्टाने सांगितलं.
'हे' तेच का?
सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती माधव जामदारांनी सरकारी वकिलांना विचारलं की, हे तेच प्रकरण आहे का, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे. त्यावर सरकारी पक्षाने हो म्हटलं. हे ऐकून न्यायमूर्ती म्हणाले, मग अजून त्यांच्यावर एफआयआर का दाखल नाही? त्यानंतर कोर्टात पुढे काय घडलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. अंजली दमानिया यांनी ही माहिती दिली.मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीची सुमारे ४० एकर शासकीय जमीन तब्बल तीनशे कोटी रुपयांना विक्रीस काढल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या व्यवहारात अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार आहेत. विशेष म्हणजे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा व्यवहार झाला होता. प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर व्यवहार रद्द करण्यात आला आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली.पार्थ पवार यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे. मात्र त्यात पार्थ पवारांवर कुठलाही ठपका ठेवण्यात आलेला नाही, अशी माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.