नव्या बाबरी मशिदीसाठी देणग्यांचा वर्षाव; दोन दिवसांत 'इतकी' मोठी रक्कम झाली गोळा, नोटा मोजणारी मशीनही पडली बंद
मुर्शिदाबाद : हुमायून कबीर यांच्या पुढाकाराने मुर्शिदाबादमध्ये उभारल्या जाणाऱ्या नवीन बाबरी मशिदीसाठी देशभरातील मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या जमा होत आहेत. दानपेट्या उघडण्याचा सोमवार हा दुसरा दिवस होता. दानपेट्यांमधील रक्कम मोजण्यासाठी तब्बल ३० लोकांची टीम तैनात करण्यात आली होती.
रविवारी दानपेटीतून ३७,३३,००० रुपये मोजले गेले, तर सोमवारी ३८,३४,५७३ रुपये जमा झाल्याचे समोर आले. दोन दिवसांत हुमायून कबीर यांच्या शक्ती नगर येथील घराच्या कार्यालयात मिळालेली एकूण रोख रक्कम ७५,६७,५७३ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय, लोक बँक खात्यांद्वारेही भरघोस देणगी देत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत बँक खात्यात २.१ कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला होता.
मशिदीसाठी रोख रक्कम संकलनाचे व्हिडिओ चर्चेत
मुर्शिदाबादमधील बाबरी मशिदीसाठी चालू असलेल्या देणगी संकलनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हुमायून कबीर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काही जण मोठ्या बंडलमधील नोटा मोजताना दिसत आहेत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे, पायाभरणी कार्यक्रमात आतापर्यंत ११ पेट्या देणग्या जमा झाल्या असून, त्यासाठी ३० लोक आणि चलनी नोटा मोजण्यासाठी मशीनची मदत घेण्यात येत आहे.
हुमायून कबीर यांनी अचानक घेतला यू-टर्न
शनिवारी बाबरी मशिदीच्या पायाभरणीनंतर विधानसभेचा राजीनामा देण्याची घोषणा केलेले तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी सोमवारी आपल्या भूमिकेत मोठा बदल करत राजीनामा न देण्याचा निर्णय जाहीर केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेचा राजीनामा देत धार्मिक कार्यात लक्ष देणार असल्याचे सांगितले होते.मात्र, पायाभरणीनंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी भूमिका बदलत, "आता माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. मी आमदारपदाचा राजीनामा देणार नाही," असे स्पष्ट वक्तव्य केले. ही घटना सध्या मुर्शिदाबादमध्ये आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.