कोल्हापूर : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय बिलांबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सोमवारी शिवसेनेने स्टिंग ऑपरेशन करत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. वैद्यकीय बिलाबाबतच्या फाईल्स प्रलंबित ठेवून अर्थपूर्ण घडामोडी केल्या जात असल्याचे समोर आणले. यावेळी वैद्यकीय बिलांसाठी घेतलेल्या रकमेची नोंदवही सापडली. या सर्व पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी मंगळवारी ही समिती नेमली.उपसंचालक माने यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत हिवतापचे सहायक संचालक डॉ. दिलीप माने आणि सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील प्रशासन अधिकारी दीपक वरक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असेही या आदेशात म्हटले आहे.ही समिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर यातील दोषींवर कारवाई केली जाईल, तसेच याप्रकरणी कक्ष सेवक शशिकांत कारंडे यांची खुपिरे येथे मंगळवारपासून (दि. 9) सेवा वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी सांगितले.
अशी आहे समिती...
या समितीत उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ (अध्यक्ष), सहायक संचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर (हिवताप) आणि जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली यांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांनी कार्यालयीन आदेश जारी करून समितीची स्थापना केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.