Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरचे तत्कालीन एसपी महेंद्र पंडित यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, २८० कोटींचा घोटाळा अन् चार्जशिट १२ कोटींची; कोर्टाने धरलं धारेवर

कोल्हापूरचे तत्कालीन एसपी महेंद्र पंडित यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, २८० कोटींचा घोटाळा अन् चार्जशिट १२ कोटींची; कोर्टाने धरलं धारेवर


कोल्हापूर : 'जादा परताव्याच्या आमिषाने ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसकडून २८० कोटींची फसवणूक असताना बारा कोटींचे चार्जशीट का, यामध्ये तपास काय केला?, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तपासी अधिकाऱ्यांना आज धारेवर धरले.

अखेर तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश केले. पुढील सुनावणी मंगळवारी (ता. ९) होणार आहे. ग्रोबझ ट्रेडिंग फसवणूकप्रकरणी मुख्य संशयित विश्वास कोळी याच्या जामीन अर्जासाठी आज सर्किट बेंचमध्ये सुनावणी होती.

या सुनावणीसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनंतर ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला त्यांना हजर राहण्यास सांगितले होते. यामध्ये श्रीकांत इंगवले, विशाल मुळे, शीतल कोल्हाळ, पल्‍लवी यादव, चेतन मसुटगे आदी अधिकारी उपस्थित होते.

फिर्यादी रघुनाथ खोडके यांच्यावतीने ॲड. जयंत बारदेस्कर यांनी बाजू मांडताना झालेल्या तपासाची माहिती न्यायालयात दिली. ज्यामध्ये पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये फसवणुकीची रक्कम २८० कोटी असल्याचे निदर्शनास आणले.

याबाबत न्यायालयाने गांभीर्याने घेत प्रत्येक तपासी अधिकारी यांना तुम्ही काय तपास केला? असा सवाल केला. याबाबत तपासी अधिकारी असमाधानकारक उत्तर देत असताना न्यायमूर्ती दिगे यांनी अहवाल वाचल्यासारखे सांगू नका. 

तपास काय केला हे सांगा?, किती जणांना अटक केली, किती आरोपी आहेत, किती जणांची प्रॉपर्टी अटॅच केली?', अशा शब्दांत सुनावले. तपास असमाधानकारक असल्याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. तपास अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचेही दिसून आले. अखेर न्यायमूर्ती दिगे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मंगळवारी (ता. ९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश केले.

आवश्यकता भासल्यास 'एसआयटी' नेमण्याचेही संकेत दिले. ॲड. बारदेस्कर ऑनलाईनद्वारे सहभागी झाले. त्यांच्यावतीने ॲड. अहिल्या नलवडे न्यायालयात हजर होत्या. सरकार पक्षातर्फे ॲड. श्रीराम चौधरी हजर होते. येथे कोळीचेही वकील उपस्थित होते. दरम्यान, ए. एस. ट्रेडर्समधील फसवणुकीबाबतदेखील आज सुनावणी होती. मात्र, पुढील तारीख देण्यात आली.
एसआयटी नेमण्याचेही संकेत

तुम्ही किती जणांना अटक केली, किती जणांच्या प्रॉपर्टी अटॅच केल्‍या, तुम्हाला कोण संशयित सापडले काय?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती दिगे यांनी तपास अधिकाऱ्यांवर केली. यावर तपास अधिकारी निरुत्तर झाले. तपास योग्य होत नसल्याबद्दलही न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. एसआयटी नेमण्याचेही संकेत दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.