या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वूमन्स क्रिकेट टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्वत: स्मृतीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. स्मृती आणि संगीतकार असलेला पलाश या दोघांचं नोव्हेंबर महिन्यात सांगलीत लग्न होणार होतं. मात्र स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न स्थगित करण्यात आलं होतं.
त्यानंतर पलाश याचीही प्रकृती बिघडली. त्यामुळे लग्न लांबणीवर पडलं. या दरम्यान अनेक अफवाही पाहायला मिळाल्या. त्यामुळे या दोघांचं ठरलेलं लग्न मोडणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अखेर तसंच झालंय. स्मृतीनंतर पलाश मुच्छल यानेही इंस्टाग्रामद्वारे स्टोरी पोस्ट करत लग्न मोडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पलाशने संताप व्यक्त केला आहे. पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर दणका देणार असल्याचा थेट इशारा या स्टोरीद्वारे दिला आहे.
पलाशने स्टोरीत काय म्हटलंय?
“वैयक्तिक आयुष्यातून एक पाऊल मागे घेत आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे, ज्यामुळे नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि वेगळे होण्याच्या बातम्यांना हवा मिळाली”, असं पलाशने म्हटलंय. पलाश आणि स्मृती मंधाना दोघांनी याआधी लग्न लांबवणीवर पडल्यानंतर आपल्या बायोमधून हळदी आणि लग्न समारंभादरम्यानचे फोटो हटवले होते. तसेच दोघांनीही बायोमध्ये एक खास इमोजी (दृष्ट न लागावी हे दर्शवणारी इमोजी) जोडला होता. त्यामुळे या दोघांचं स्थगित झालेलं लग्न पुन्हा होणार की नाही? ही चर्चा रंगली होती. मात्र अखेर संगीतकार-क्रिकेटरची पार्टनरशीप होण्याआधीच ब्रेक झाली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत.
पलाश मुच्छल याची इन्स्टा स्टोरी, महिला क्रिकेटपटूंकडून फोटो डिलिट
दरम्यान वूमन्स टीम इंडियाचे खेळाडू स्मृतीच्या लग्नासाठी सांगतील पोहचले होते. स्मृतीची हळद मोठ्या धमाक्यात पार पडली. जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकुर, राधा यादव आणि इतर सहकाऱ्यांनी स्मृतीच्या हळदीत धमाल केली. स्मृतीसोबतचे फोटोही महिला क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र लग्न लांबणीवर पडताच सर्व क्रिकेटपटूंनी स्मृतीसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन हटवले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.