पुणे :- दोन कोटींची लाच मागणारा PSI प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ; ४६ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला होता
पिंपरी-चिंचवड : दोन कोटींच्या लाचप्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी त्यासंबंधीचे आदेश जारी केले असून, चिंतामणी यांच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली.
पाच कोटींचा दामदुप्पट घोटाळा
पोलिसांच्या सांगण्यानुसार, चिंतामणी यांने पिंपरी-चिंचवड शहरातील ४० हून अधिक नागरिकांना "पैसे दुप्पट करून देतो" या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील एकूण फसवणुकीचा आकडा तब्बल ५ कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही पीडितांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. तपासादरम्यान हे देखील समोर आले की, चिंतामणी फसवणुकीचे पैसे स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यावर जमा करून घेत होता.
लाच घेताना रंगेहाथ अटक
२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कोटींची लाच मागणाऱ्या चिंतामणीला जाळ्यात ओढले. ४६ लाख ५० हजार रुपये लाच स्वीकारताना PSI चिंतामणी रंगेहाथ पकडला. घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तो त्या वेळी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता.
कठोर कारवाईचे स्वागत
लाचखोरी आणि मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये नाव अडकल्याने अखेर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या कारवाईमुळे पोलिस दलामध्ये शिस्तबद्धता आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक संदेश जात असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.