दिल्लीच्या कक्कडडूमा कोर्टात वकील राकेश किशोर यांना चप्पलांनी मारहाण बूट फेकल्यानंतर माजी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांना माफ केले होते. दिल्लीतील एका कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या माजी सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाला दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टातील वकिलांनी चप्पलांनी चोपल्याची घटना घडली आहे. वकील राकेश किशोर याने माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर माजी सरन्यायाधीश बी आर गवई यांनी राकेश किशोरला माफ केलं होतं. मात्र, आज मंगळवारी कोर्टाच्या परिसरात वकिलांच्या गटाने चप्पलांनी मारल्याची घटना घडली आहे.
राकेश किशोर कोर्टात आला होता. त्यावेळी काही वकिलांच्या गटाने त्याच्यावर हल्ला केला. राकेशला धक्काबुक्की करत चप्पलांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर कोर्टाच्या सुरक्षारक्षकांनी राकेश किशोरची सुटका केली. तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोरला निलंबित केलं होतं. देशभरातून टीका झाल्यानंतरही राकेश किशोरला कोणताही पश्चाताप झाला नव्हता.गवई यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्याने म्हटलं होतं की, माझ्या स्वप्नात देवाने येऊन बूट फेकून मारण्यास सांगितलं होतं. किशोर हा २००९ पासून बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत वरिष्ठ वकील म्हणून काम करत होता. त्याचं अंदाजे वय हे ७१-७२ वर्ष इतकं आहे. राकेश किशोरला बार कौन्सिल ऑफ इंडियाने निलंबित केल्याने त्याला कोणतीही केस लढवता येणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राकेश किशोरने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर १ मध्ये सुनावणीदरम्यान तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांना बूट फेकून मारला होता. सुप्रीम कोर्टातील एका कोर्टरुममध्ये सकाळी ११.३५ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या कोर्टरुममध्ये खजुराहो (मध्य प्रदेश) येथील जवारी मंदिरातील भगवान विष्णू मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबधित खटल्याच्या सुनावणी सुरू होती. त्यावेळी किशोर याने तत्कालीन भूषण गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कोर्टातील सुरक्षारक्षकांनी तातडीने राकेश किशोरला ताब्यात घेतलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.