Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना

पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना


मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अधिकारी असल्याचे भासवून एका ठगाने आपल्या साथीदारांच्या मदतीने व्यापाऱ्याला तीन कोटींना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिवळ्या दिव्याच्या कारमध्ये बसवून व्यापाऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर नेण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री नसल्याचे सांगत तसेच माघारी फिरून विश्वास संपादन केला. वैभव ठाकर असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह त्याची पत्नी, सासू आणि दलालाविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
झवेरी बाजार येथील व्यापारी शैलेश जैन यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्यासोबत नियमित व्यवहार करणारे दलाल बिरजू याने वैभव ठाकरसोबत ओळख करून दिली होती. वैभवने 'वर्षा' बंगल्यावर अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदाराला मदतीचे आश्वासन देत जाळ्यात ओढले. वैभव पिवळा दिवा असलेल्या कारमधून यायचा व प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांसोबत केव्हाही भेट घालून देईन, असे सांगायचा. त्यानंतर, विविध कारणे पुढे करत पैसे उकळणे सुरु केले.


अडीच कोटींचे दागिने खरेदी

कस्टम विभागात जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो. पत्नी, सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करते असे सांगून अनुक्रमे १.१५ कोटी रुपये आणि १.३५ कोटी रुपयांचे दागिने घेतले. मात्र ही रक्कम व दागिने घेऊन वैभवने सांगितलेली कामे केली नाहीत. त्यानंतर पैसे परत देण्याबाबत तगादा लावताच वैभवची टाळाटाळ सुरु झाली.

राजकीय पक्षाच्या कार्यालयात धमकावले...
पुढे, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह कार्यालयात येऊन तक्रारदार व त्याच्या मुलाला धमकावले, असेही तक्रारीत नमूद आहे. या धमकीबाबत तक्रारदाराने वैभवविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, वैभवने डीआरआयकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे तक्रारदार जैन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यात ते दीड महिना अटकेत होते. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर जैन यांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.