आगामी महापालिका निवडणुकीसाठी कट्टर विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील विरोध हा सर्व सांगली जिल्ह्याला परिचित आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत वेगळे लढलो तर त्याचा फायदा भाजपला होईल, हे उघड सत्य असताना हे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत.
आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सांगली महापालिकेसाठी युती करणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील म्हणाले की, पुढील दोन तीन दिवसांत जागा वाटप निश्चित केले जाईल.जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी त्यांचा डीएनए हा काँग्रेसचा आहे. सांगली महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. आमची जागा वाटपावर चर्चा झाली, पण मुर्त स्वरूप आले नाही. जागा वाटपाची घोषणा लवकरच करणार आहोत.
अखेर आघाडी झाली
नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आणि महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एक राहिली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ही भूमिका पटलेली नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची मानसिकता आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर जयंत पाटील यांनीच आघाडीची घोषणा करून महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.