प्रत्येकाला बसवावेच लागेल वीजेचे स्मार्ट मीटर! सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे सूट; भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज
सोलापूर : वीजबिलाचा वेळेत भरणा नाही, विजेच्या तारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणे, अशा प्रकारांमुळे 'महावितरण'ने आता प्रत्येक ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर शहरातील ६५ हजार तर ग्रामीणमधील एक लाख ८५ हजार घरात ते मीटर बसविले आहेत. उर्वरित पाच लाख २० हजार २८० ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे.
सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात 'महावितरण'चे सात लाख ७२ हजार ६१३ घरगुती ग्राहक आहेत. त्यापैकी ४२ टक्के ग्राहक दरमहा नियमित भरतात आणि बाकीचे ग्राहक विलंबाने (दोन-तीन महिन्यांनी) भरतात. दरवेळी थकबाकीतील ग्राहकांवर कारवाईची मोहीम राबवावी लागते, त्यावेळी वादविवाद होतात. पोलिसांत देखील खटले दाखल होतात. या सर्व बाबींवर आता स्मार्ट मीटर रामबाण उपाय असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. या मीटरमुळे ग्राहकांना सकाळी ९ ते पाच या वेळेत वीज वापर केल्यास त्यावर 'टीओडी'अंतर्गत (टाइम ऑफ डे) प्रतियुनिट ८० पैसे सवलत दिली जात आहे.पुढे ही सवलत एक ते दीड रुपयांपर्यंत असणार आहे. या मीटरमुळे आपण कोणत्या वेळेत किती वीज वापरली, त्याचे बिल किती रुपये झाले हे घरबसल्या समजते. दुसरीकडे 'महावितण'ला देखील वीज वितरणाचे नियोजन करणे सोपे झाले आहे. वीजचोरी, गळती रोखण्यासाठी हे मीटर उपयोगी ठरत आहे. आता कोणी विरोध करीत असेल, पण त्यांना पुढे स्मार्ट मीटर बसवावेच लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
'स्मार्ट मीटर'ची जिल्ह्यातील स्थिती
एकूण ग्राहक
७,७२,६१३
स्मार्ट मीटर बसविलेले
२,५२,३३३
स्मार्ट मीटर न बसविलेले
५,२०,२८०
पुढे जेवढा रिचार्ज तेवढीच वीज
स्मार्ट मीटरमध्ये प्रिपेड रिचार्जची देखील सोय आहे. भविष्यात वीजबिल वसुलीची कटकट कायमची टाळण्यासाठी ग्राहकांना वीजेसाठी रिचार्ज करावा लागणार आहे. मोबाईल रिचार्जप्रमाणे ते जेवढा रिचार्ज करतील किंवा त्यांचा रिचार्ज जेव्हा संपेल, तेव्हा वीज आपोआप बंद होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तुर्तास, जुन्याच पद्धतीने वीजबिल वसुली सुरु आहे.विभागनिहाय स्मार्ट मीटर बसविलेले ग्राहकविभाग स्मार्ट मीटर बसविलेलेसोलापूर शहर ६४,९२८सोलापूर ग्रामीण ५५,०२७पंढरपूर ५१,३६०बार्शी ५३,०८१अकलूज २७,९३७
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.