सांगली जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक दोन लाखांच्या पाच गाड्या जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई
सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणत दोन लाखांच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
रोहीत संजय जावळे (वय २३), सुखलाल उर्फ नांज्या गुंडु शिंदे (वय २२, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरट्याना पकडण्याच्या सूचना तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेचे पथक शहरात चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी इंदिरानगर ते काशिपुरा गल्ली मार्गावरील स्मशान भूमिजवळ दोघेजण दुचाकी घेऊन थांबले असून त्या चोरीच्या असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने तेथे जाऊन दोघांकडे गाड्यांबाबत चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी तासगाव येथून दोन, पलूस, कवठेमहांकाळ, सांगली शहरातून एक अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून पाचही दुचाकी जप्त करण्यात आल्या.तासगावचे पोलीस उपाधीक्षक अशोक भवड, तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, अमर सुर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सुरज जगदाळे, बजरंग थोरात, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.