Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली - मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे 'मॉडर्न रूप' MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

सांगली - मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे 'मॉडर्न रूप' MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!


सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. परिणामी, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अद्ययावत सेवासुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालय व तपासणी केंद्रात भरमसाठ शुल्क देण्याची गरज राहिलेली नाही. रुग्णांनी या शासकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी धोरण आखले आहे.

राज्य शासनाच्या निधीसाठी पाठपुरावा तसेच जिल्हा नियोजन समितीमधून सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी तरतूद केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून दोन वर्षांत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर लेबर रुम, मॉड्युलर सेमी आयसीयुसह ३ टेस्ला एमआरआय मशीन, सीटी स्कॅन मशीन दोन ४के लॅप्रोस्कॉपी मशीन, सर्जिकल हॅड इन्स्ट्रूमेंट, औषधे व सर्जिकल साहित्य खरेदी केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून २०२३-२४ मध्ये मंजूर नवीन ३ टेस्ला क्षमतेचे एमआरआय मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरू झाले. यापूर्वीच्या एमआरआय मशीनची क्षमता ०.३ टेस्ला इतकी होती. ज्यामुळे दिवसातून फक्त ५ ते ६ एमआरआय होत होते. जिल्हा नियोजनमधून प्राप्त या नवीन ३ टेस्ला एमआरआयमध्ये दिवसातून ३० ते ५० रुग्णांचे एमआरआय होत आहेत.

सीटी स्कॅन मशीन

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन उपलब्ध नव्हते. गतवर्षी जिल्हा नियोजन निधीमधून शासकीय रुग्णालय, सांगली येथे नवीन १२८ स्लाईस क्षमतेचे सिटी स्कॅन मशीन आले. तेथे सुमारे १० हजार ९६३ सीटी स्कॅन केले आहेत. खासगी केंद्रामध्ये त्यासाठी २ ते ४ हजार रुपये खर्च येतो. येथे दारिद्र्यरेषेखालील व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांना मोफत व इतर रुग्णांना ३०० रुपये इतके शुल्क आकारले जाते.

अत्याधुनिक लॅप्रोस्केपी मशीन
स्त्री रोगांच्या अनुषंगाने शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या दोन्ही रुग्णालयांत स्त्री रोग विभागात सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अत्याधुनिक लॅप्रोस्कॉपी मशीन उपलब्ध करून दिले आहे.

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी खासगी केंद्रामध्ये २० हजारांहून अधिक रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयात आरोग्य योजनेत बसणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. उर्वरित रुग्णांकडून नाममात्र २ ते ३ हजार रुपयांची फी आकारली जाते. या मशीनमुळे २७० रुग्णांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया झालेली आहे.
मॉड्युलर लेबर रूम

मॉड्युलर लेबर रूममुळे नैसर्गिक प्रसूती करणे सोपे झाले आहे. ज्यामुळे जंतुसंसर्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. सुविधेमुळे मिरज सिव्‍हिलमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात आतापर्यंत एकूण तीन हजार प्रसूती मोफत झाल्या आहेत. याशिवाय मेल-फीमेल मेडिसीन, सेमी आयसीयु - सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मेल मेडिसीन, सेमी आयसीयु व फीमेल मेडिसीन सेमी आयसीयु तसेच अत्याधुनिक स्त्री रोग विभाग केला आहे. आयसीयु बेड उपलब्ध नसल्यास वर्डमध्येच रुग्णांना आयसीयुच्या सुविधा यामुळे उपलब्ध होत आहेत. जिल्हा नियोजन निधीमधून अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्र विभाग सुरू केला आहे.

एमआरआय यंत्र मोफत
खासगी केंद्रामध्ये एमआरआय करण्यासाठी आठ ते १४ हजार रुपये खर्च येतो. मिरज शासकीय रुग्णालयात दारिद्र्यरेषेखालील सर्व रुग्णांचे तसेच 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'मध्ये बसणाऱ्या सर्व रुग्णांचे एमआरआय स्कॅन मोफत केले जाते. इतर रुग्णांकडून १८०० ते २००० रुपये शुल्क आकारण्यात येते. नवीन एमआरआय मशीनद्वारे आजअखेर १२ हजार ५७० एमआरआय स्कॅन करण्यात आले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.