पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता, आत्महत्या करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच गोंधळ
लोणी काळभोर: यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून व मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याने पोलिस दलातील एक कर्मचारी मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून गायब झाल्याने जिल्हा ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले आहे. त्या स्टेटस वर त्यांनी स्वतःच्याच फोटोवरच भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुलीला असे लिहिले आहे की, “माझी प्रिय दिदी,आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेऊन जाता आले नाही.यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेली 1 वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा” तसेच स्वतःच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. तसेच निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले असून त्यांचा गुरुवारपासून फोन बंद आहे.
दोन दिवसांपासून दखल नाहीच
पोलीस नाईक निखिल रणदिवे यांची मागील एक वर्षापूर्वीच बदली झाली होती. परंतु यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी बदलीच्या ठिकाणी सोडले नाही. या त्रासाला कंटाळून पोलीस नाईक निखिल रणदिवे हे जीवाचे बरे वाईट करत आहे असे म्हणून मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यांचा फोन बंद लागत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून अद्यापही त्यांची दखल घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
सुसाईड नोट
पोलिस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे 1 वर्षापासून मानसिक त्रास देत आहेत. माझी सन 2025 मध्ये शिक्रापुर पोलीस ठाण्यात सर्वसाधरण बदली झाली आहे. परंतु, मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास दिला जात आहे. सदर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. “माझ्या मृत्युस नारायण देशमुख जबाबदार आहेत” असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.